रूग्णांच्या नातेवाईकांची दमछाक केलेले ११८०० रेमडेसिविर इंजेक्शन्स सोलापुरात शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 06:59 PM2021-06-04T18:59:19+5:302021-06-04T18:59:25+5:30

कोरोना रुग्ण घटल्याचा परिणाम : ग्रामीणमध्ये ३४०० पैकी २०७४ बेड रिकामे

11800 Remadecivir injections left in Solapur | रूग्णांच्या नातेवाईकांची दमछाक केलेले ११८०० रेमडेसिविर इंजेक्शन्स सोलापुरात शिल्लक

रूग्णांच्या नातेवाईकांची दमछाक केलेले ११८०० रेमडेसिविर इंजेक्शन्स सोलापुरात शिल्लक

Next

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी प्रशासन व रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक झाली पण आता लाट ओसरल्याने जिल्हा प्रशासनाने चक्क ११ हजार ८०० रेमडेसिवर इंजेक्शन शिल्लक असल्याचे दिसून आले आहे.

एप्रिल महिन्यात रुग्ण वाढल्यावर ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनची देशभरात मागणी वाढली होती; पण कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा न झाल्याने जिल्हा प्रशासनाने वितरण व्यवस्थेवर ताबा घेतला होता. खासगी वितरकांकडे आलेली इंजेक्शनचे जिल्हाधिकारी कार्यालयातून कोविड हॉस्पिटलला वितरण होत होते तरीही नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी धडपड करताना दिसत होते. अनेकांनी पुणे, बंगळुरूपर्यंत प्रवास केल्याचे सांगण्यात येत होते. या काळात बोगस इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्यांनाही पकडण्यात आले. पण आता मेअखेर परिस्थिती बदलल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा प्रशासनाकडे ११ हजार ८०० रेमडेसिवीरचा पुरवठा झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन वापरण्यात येणार आहेत. भविष्यातील गरज व सध्या येणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांसाठी या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर टोसीझील्युमचे ६८ इंजेक्शन उपलब्ध आहेत.

शहर व ग्रामीण भागात रुग्ण कमी झाले आहेत. ग्रामीण भागात ९७ कोविड हॉस्पिटलमध्ये ३४०० बेड उपलब्ध आहेत. त्यात १२७८ साधे बेड, १८३० ऑक्सिजन बेड तर २९२ बेड व्हेंटिलेटरची सोय असलेले आहेत. ३ जून अखेर यातील साध्या बेडवर ३७१, ऑक्सिजनवर ७७१ व व्हेंटिलेटरवर १८४ रुग्ण उपचार घेत आहेत. साधे ९०७, ऑक्सिजनचे १०५९ व व्हेंटिलेटरचे १०८ असे २०७४ बेड शिल्लक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले. ग्रामीणमध्ये ४ हजार ६४९ रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यातील २ हजार ९७८ जण कोविड केअर सेंटरमध्ये, ३४५ जण होम आयसोलेशनमध्ये तर १ हजार ३२६ जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

होम आयसोलेशन पर्याय बंद

राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे होम आयसोलेशनचा पर्याय बंद करण्यात आला आहे. त्यामुळे २ हजार रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे तरीही सद्य:स्थितीत ३४५ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. अक्कलकोट : १२, बार्शी : १९, करमाळा : ३३, माढा : ९, माळशिरस : १९४, मंगळवेढा : १५, मोहोळ : ०, उ. सोलापूर : २, पंढरपूर : ३७, सांगोला : २२, द. सोलापूर : २.

कोविड सेंटरमधील रुग्ण

  • अक्कलकोट : १०६
  • बार्शी : ४१३
  • करमाळा : ४०७
  • माढा : ४६७
  • माळशिरस : ४२३
  • मंगळवेढा : १४८
  • मोहोळ : ९४
  • उ. सोलापूर : ३९
  • पंढरपूर : ४५७
  • सांगोला : ३२७
  • द. सोलापूर : ९७

Web Title: 11800 Remadecivir injections left in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.