सोलापूर जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण २८ कामांसाठी १२ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:29 PM2018-09-28T14:29:18+5:302018-09-28T14:32:01+5:30
‘डीपीसी’त मंजुरी : ३१ कोटींच्या ४९ प्रस्तावांमध्ये केली कपात
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेसाठी ३१ कोटी २८ लाख खर्चाचे ४९ प्रस्ताव सादर करण्यात आले होते, त्यात समितीने कपात करून यातील फक्त २८ प्रस्तावांच्या १२ कोटी ८ लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून, प्रत्यक्षात ११ कोटी २८ लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०१८-१९ या वर्षासाठी नावीन्यपूर्ण योजनेतील निधीची मर्यादा लक्षात घेऊन पुढील कामांना मंजुरी देण्यात आली. गोपाळपूर येथील भक्त निवासमध्ये स्वयंपाकगृह व संरक्षक भिंत बांधणे खर्च: १६ लाख, सोलापुरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधणे: ५० लाख, महिलांसाठी बचत गट भवन: ५0 लाख, रुपाभवानी स्मशानभूमीभोवती कुंपण बांधणे: ५० लाख, जुने विडी घरकूल येथे प्रसूतीगृह बांधणे :७५ लाख, मेडिकल कॉलेजमध्ये डायलेसीस सेंटर उभारणे :२0 लाख, ढवळस ते सीना नदीपर्यंत बेंद नाला खोलीकरण डिझेल खर्च:१ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्रावर नातेवाईकांसाठी नाश्ता काऊंटर सुरू करणे: ५० लाख, अंगणवाड्यातील बालकांना स्वच्छ व आरोग्य पाण्यासाठी वॉटर प्युरीफायरची व्यवस्था: ५० लाख.
नातेपुते येथील शिवकालीन तलावाची दुरुस्ती: २५ लाख, अभिजित गांजळे यास धनुर्विद्येचे साहित्य खरेदी करून देणे: २ लाख २४ हजार, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवजात अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी कॅप मशीन देणे: ४९ लाख ३५ हजार, एचआयव्ही विभागाच्या किट व एआरटी ड्रग साठवणुकीसाठी वॉक इन कुलरची खरेदी: ५० लाख.
पिंपळनेर (माढा) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास एक्स-रे मशीनची खरेदी: २५ लाख, वन विभागामार्फत बेलाटी येथे जैव विविधता प्रकल्पाची उभारणी: १ कोटी, अंध बांधवासाठी सेन्सारी गार्डनची उभारणी: ३० लाख, केटीवेअर नवीन दरवाजे घेणे व दुरुस्ती करणे: १३ लाख ८८ हजार, आरटीओ कार्यालयासाठी संगणक खरेदी: १५ लाख, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात प्रसाधन गृह बांधणे: २१ लाख ३२ हजार, पाणीपुरवठा योजनांसाठी इलेक्ट्रो क्लोरीनेटर प्रकल्प राबविणे: १ कोटी, करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील आॅपरेशन थिएटर मॉड्युलर करणे: ९० लाख, सांगोला पोलीस ठाण्यात प्रतिक्षालय बांधणे: २० लाख, सांगोला बसस्थानकावर सीसी कॅमेरे बसविणे: १५ लाख, कोळे येथे बाजारगाळे बांधणे: ३० लाख, मंगळवेढा येथील स्मशानभूमीत गॅस शव दाहिनी बसविणे: १ कोटी.
या प्रस्तावांना मिळाले प्राधान्य
महापालिकेकडून आलेल्या २ कोटी ४५ लाखांच्या पाच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शिफारस केलेल्या बेंद नाल्याच्या कामासाठी १ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आमदार रामहरी रुपनवर यांनी सुचविलेल्या नातेपुते तलावास २५ लाख, आमदार गणपतराव देशमुख यांनी सुचविलेल्या तीन कामांना ६५ लाख आणि अजित जगताप यांनी शिफारस केलेल्या मंगळवेढा येथे गॅस शववाहिनी बसविण्यासाठी १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सडकसाठी ४८ कोटी
- सोलापूर जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना सन २0१८—१९ साठी ३२२ कोटी निधी मंजूर केला आहे. नियोजन समितीने यातील निधीचे वाटप पुढीलप्रमाणे केले आहे. नियमित योजना: २५७ कोटी ८४ लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना: ४८ कोटी ३४ लाख, नावीन्यपूर्ण योजना: ११ कोटी २८ लाख, राज्य नावीन्यता परिषद: १ कोटी ६१ लाख, जिल्हा नावीन्यता परिषद: १ कोटी ६१ लाख, मूल्यमापन, डेटा एंट्री, सनियंत्रण: १ कोटी ६१ लाख.