१२ हजारांची वाळू अन् २ लाखांची वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:23+5:302021-05-30T04:19:23+5:30
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशानुसार, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल जयंत माळी, पोलीस नाईक ...
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशानुसार, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल जयंत माळी, पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल पाटील हे शहर बीट हद्दीत खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. माण नदीपात्रातून वाळू भरून चारचाकी वाहन जात असताना त्यांचा पाठलाग करून पकडले. पोलिसांनी वाहनातील धीरज बनसोडे (रा. सांगोला) व पवनकुमार लवटे (रा. सावे) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या इसमांची चौकशी केली असता, निखिल गडहिरे, कपिल सावंत (रा.सांगोला) अशी त्यांची नावे असल्याचे सांगितले. पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहनासह ४ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत पोना गणेश मेटकरी, सपोफौ पवार, पोलीस पाटील धायटी असे एखतपूर बीट हद्दीत खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना, धायटी येथे जिजामाता मंगल कार्यालयाजवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा टेम्पो पकडला. टेम्पो चालक एकनाथ इंगोले (रा.बामणी, ता. सांगोला) यास ताब्यात घेतले. यावेळी चालकाशेजारी बसलेला इसम पळून गेला. त्याच्याकडे पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता, त्याने प्रज्वल इंगळे (रा. बामणी) असे सांगितले. पोलिसांनी या कारवाईत १ लाख २० हजार रुपये किमतीचा टेम्पो, ८ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल जयंत माळी व पोलीस नाईक गणेश मेटकरी यांनी सहाजणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.