जीपसह १२०० लिटर हातभट्टी दारू जप्त; सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By Appasaheb.patil | Updated: October 16, 2022 14:20 IST2022-10-16T14:19:55+5:302022-10-16T14:20:01+5:30
जीपच्या मधल्या सिटवर व पाठिमागील हौदात हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण १३ मोठ्या रबरी ट्युब मिळून आल्या.

जीपसह १२०० लिटर हातभट्टी दारू जप्त; सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता मुळेगाव तांडा-सोलापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून बाराशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक होत असताना पकडली असून या गुन्ह्यात ५ लाख ६१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणाहुन एका बोलेरो जीपमधुन अवैध हातभट्टी दारुची वाहतुक होणार आहे. त्यानुसार निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने मुळेगाव तांडा रोड ते सोलापूर रोडवर सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा लावून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जीप क्र. MH-37-A-2227 या जीपला समोरासमोर वाहन आडवे लावून सदर वाहन थांबवले असता वाहनातून दोन इसम उतरुन अंधाराचा फायदा घेवुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका इसमास पकडले व एक इसम पळून गेला. त्यानंतर अडविलेल्या वाहनाची तपासणी केली असता जीपच्या मधल्या सिटवर व पाठिमागील हौदात हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण १३ मोठ्या रबरी ट्युब मिळून आल्या. या कारवाईत वाहनातील पिंटु सोमनाथ राठोड (रा. मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर) यास अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास निरिक्षक सदानंद मस्करे निरीक्षक हे करत आहेत.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदानंद मस्करे निरीक्षक ब विभाग, सहायक दुय्यम गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट यांनी पार पाडली.