कोजागिरी पोर्णिमेसाठी राज्यभरातून १२०० एसटी बसेस
By admin | Published: October 13, 2016 06:39 PM2016-10-13T18:39:48+5:302016-10-13T19:13:49+5:30
राज्यात शनिवार व रविवार रोजी साजरी होणाऱ्या कोजागिरी पोर्णिमेसाठी तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या व दर्शन घेऊन परत जाणाऱ्या भाविकांसाठी
आप्पासाहेब पाटील/ऑनलाइन
सोलापूर, दि. 13 - राज्यात शनिवार व रविवार रोजी साजरी होणाऱ्या कोजागिरी पोर्णिमेसाठी तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या व दर्शन घेऊन परत जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे विभागातून ५०० तर औरंगाबाद विभागातून ६९० बसेस याशिवाय विविध आगारातून १२०० बस गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती परिवहन महामंडळाने दिली़
दरम्यान परिवहन महामंडळाने १३ आॅक्टोबर ते १७ आॅक्टोबर या कालावधीत एस-टी नियोजनाप्रमाणे व गरज भासल्यास जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे़ कोणत्याही यात्रेकरुंची गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्व महामंडळातील अधिकारी-कर्मचारी घेत आहेत. यात्रा काळात परिवहन महामंडळाने जादा वाहक, चालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ कर्नाटक राज्यातील वाहतूकीसाठी तुळजापूर आगारातील नवीन बस स्थानक उपलब्ध करून देण्यात आले आहे़ तर सोलापूरात परतीने येणाऱ्या प्रवाशांसाठी जुना पुना नाका, बोरामणी नाका, तुळजापूर नाका येथे बसस्थानक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे़ या सर्वच ठिकाणांवर परिवहन मंडळाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत़
कोजागिरी पोणिमेनिमित्त तुळजापूरसह विविध आगारात येणाऱ्या भाविकांसाठी २४ तास वाहतूक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत़ भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षिततेसाठी बसस्थानकावर पोलीसांची मदत केंद्रे, भाविकांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षण कक्ष उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन भाविकांना एस.टी. बसेसनेच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहतुक मार्गात बदल
कोजागिरी पोर्णिमेनिमित्त वाहतुकीची कोंडी होवू नये व पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेतेसाठी परिवहन महामंडळाने वाहतूकीच्या मार्गात बदल केला आहे़ कर्नाटक राज्यातील वाहतूक हुमनाबाद, गुलबर्गा व उमरगा या मार्गावरील वाहतूक तुळजापूर-पाटोदा फाटा-लोहारा-माकणी-नारंगवाडी-चौरस्ता-उमरगा या मागार्ने तर सोलापूर या मार्गावरील वाहतूक तुळजापूर-मंगरुळ फाटा-टेलरनगर-इटकळ-बोरामणी-सोलापूर या मार्गाने करण्यात येणार आहे़ तसेच तुळजापूर-उस्मानाबाद-नारी चिखर्डे-बार्शी या मागार्नेही बार्शीची वाहतूक करण्यात आली आहे़
नो कॅरींग एसटी बसेस
तुळजापूर येथे कोजागिरी पोर्णिमेसाठी भाविक पायी चालत येतात़ मात्र परत आपल्या गावी जाण्यासाठी एसटी बसेसने प्रवास करतात़ परतीचा प्रवास करताना भाविकांची संख्या मोठया प्रमाणात असते़ यावेळी काही भाविक एसटीच्या टपावर बसून धोकादायक प्रवास करतात़ यंदा या धोकादायक प्रवासापासून प्रवाशांना रोखण्यासाठी एसटी महामंडळाने नव्याने दाखल झालेल्या नो कॅरींग बसेसचा वापर मोठया प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आहे़ शिवाय पोलीसांच्या मदतीसाठी टपावरून होणारा प्रवास रोखण्याचा प्रयत्नही एसटी महामंडळ करीत आहे़
असे आहे एसटीचे नियोजन
औरंगाबाद विभाग - ६९०
सोलापूर आगार : २५०
पुणे आगार : ४०
कोल्हापूर आगार : ७०
सांगली आगार : ७०
सातारा आगार : ७०
सोलापूर विभागाने २५० एसटी बसेसचे नियोजन केले आहे़ प्रवाशांना सुरक्षित व विना अडथळा प्रवास देण्यासाठी परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे़ शिवाय जादा कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याकामी सर्व विभागाची मदत घेण्यात येत आहे़
- श्रीनिवास जोशी
विभाग नियंत्रक, सोलापूर विभाग़