राम मंदिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाठविल्या होत्या १२०० शिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 12:20 PM2020-08-04T12:20:35+5:302020-08-04T12:22:26+5:30
प्रत्येक गावात केले होते शिलापूजन; रामज्योती कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन
सोलापूर : अयोध्या येथे बुधवारी राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे; त्यानंतर बांधकामास सुरुवात होणार आहे; पण मंदिराच्या निर्माणासाठी १९८९ मध्ये जिल्ह्यातून सुमारे १२०० शिला (विटा) पाठविण्यात आल्या होत्या. प्रत्येक गावात शिलापूजन करण्यात आले होते.
राम मंदिराच्या निर्माणासाठी अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. विश्व हिंदू परिषदेकडून शिलापूजनाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक गावागावातून शिलापूजन करण्यात आले होते. शहरातील अनेक मंदिरामध्ये शिलापूजन करण्यात आले होते. ३० सप्टेंबर १९८९ मध्ये घटस्थापनेच्या दिवशी शिलापूजन करण्यात आले. शिवस्मारक येथे जिल्ह्यातील सर्व शिला एकत्रित करून त्या रथात ठेवल्या होत्या. त्याच दिवशी हा रथ अयोध्येकडे रवाना झाला. त्यावेळी शहरातून मिरवणूकही काढण्यात आली होती.
राम मंदिराच्या निर्माणासाठी सोलापुरात विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. याचे यशस्वी आयोजन करण्याचे श्रेय हे त्यावेळच्या कार्यकर्त्यांना जाते. यात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री कै. बंडेश पांढरे, जिल्हा मंत्री अॅड. चंद्रकांत मोकाशी, प्रभावती सारोळकर, कै. बापूराव सारोळकर, पुरुषोत्तम उडता, भुजंगराव घुगे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष कै. अरुण वैद्य यांचा सहभाग होता.
मान्यवरांच्या सभेने चैतन्य
श्रीरामाचे बंधू भरत यांनी नंदिग्राम येथे वनवासाच्या काळात श्रीरामाच्या पादुकांचे पूजन केले होते. त्या पादुकांच्या (खडावा) अनेक प्रतिकृती तयार करून त्या देशभर पाठविण्यात आल्या होत्या. शहरातील प्रत्येक चौकामध्ये या पादुका पूजनाचा कार्यक्रम २६ सप्टेंबर १९९२ मध्ये झाला. यासोबततच साध्वी शिवा सरस्वती, ऋतंबरा देवीजी, आचार्य धर्मेंद्रजी, विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक अशोक सिंघल हे विविध टप्प्यामध्ये सोलापुरात आले होते. शिवस्मारक, पुंजाल मैदान, बसवंती मंगल कार्यालय येथे त्यांच्या सभा झाल्या होत्या.
मंदिर निर्माणासाठी रामज्योती कार्यक्रम १८ आॅक्टोबर १९९० रोजी घेण्यात आला होता. अयोध्येवरुन आणलेल्या ज्योतीच्या माध्यमातून सोलापूरकरांनी आपल्या घरासमोर दिवा प्रज्वलित केला होता. शहरातील नागरिकांनी शिलापूजन, रामज्योती कार्यक्रम, पादुका पूजन या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
- उदय वैद्य, सोशल मीडिया प्रमुख, महाराष्ट्र प्रांत, विश्व हिंदू परिषद