पंढरपुरातील १३ पुरुष, १ महिला कोरोना बाधित; संपर्कातील लोकांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 09:21 PM2020-07-01T21:21:01+5:302020-07-01T21:25:34+5:30
पंढरपुरात कोरोनाचा शिरकाव गतीने; पॉझीटिव्ह लोकांच्या संपर्कात ४७९ जण...
पंढरपूर : पंढरपुर शहरात व तालुक्यात एकूण १४ जण कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार १३ पुरुषांना तर १ स्त्रीला कारोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या १४ लोकांच्या संपर्कात ४७९ लोक आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
पंढरपूर परिसरातील बेलीचा महादेव संभाजी चौक, लाईफ लाईन हॉस्पिटल मागे, गाताडे प्लॉट, भक्त निवास, श्रध्दा हौसिंग सोसायटी मुंबई, अॅटॉप हिल मुंबई, रुक्मिणी नगर हर्षल मेडिकल जवळ, घोंगडे गल्ली, औदुंबर पाटील नगर लिंक रोड, नवीपेठ, जुनीपेठ, गणेश नगर, तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर, शेगाव दुमाला, करकंब आदी परिसरातील १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात ४७९ लोक आले आहेत. यामध्ये अधिक जोखम असलेले १८० तर कमी जोखीम असलेले २९९ लाकोंचा सहभाग आहे.
आजपर्यंत पंढरपूर शहर तालुक्यातील ग्रामीण भागात २२ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आले आहेत. त्यापैकी ८ जण बरे झाले आहेत. वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये १४ रुग्णांवर व सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात ४ रुग्णांवर उपाचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य निरीक्षक डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.