१ कोटी २८ लाख थकबाकीमुळे सोलापूरातील मोबाईलचे १३ टॉवर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:20 PM2018-02-28T13:20:41+5:302018-02-28T13:20:41+5:30
मनपाच्या थकीत करापोटी जीटीएल मोबाईल कंपनीचे १३ मोबाईल टॉवर विशेष वसुली पथकांनी मंगळवारी सील केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : मनपाच्या थकीत करापोटी जीटीएल मोबाईल कंपनीचे १३ मोबाईल टॉवर विशेष वसुली पथकांनी मंगळवारी सील केले.
जीटीएल कंपनीचे शहरात ८ तर हद्दवाढ भागात ५ टॉवर आहेत. या टॉवरची एक कोटी २८ लाख ७३ हजार ३४९ इतका कर थकीत आहे. नोटिसा पाठवूनही कंपन्यांच्या अधिकाºयांनी दखल न घेतल्याने मंगळवारी टॉवर सील करण्याची मोहीम घेण्यात आली. यात सिव्हिल लाईन (थकबाकी: १० लाख ४९ हजार), पाच्छापेठ (६ लाख ५० हजार), रामवाडी ए एरिया (७ लाख ४८ हजार), माणिक चौक (९ लाख), सिव्हिल चौक (१३ लाख), पश्चिम मंगळवारपेठ (७ लाख ४६ हजार), होटगीरोड (१३ लाख २३ हजार). यातील शेवटचे तीन टॉवर बंद होते. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या काळात ही कारवाई चालली. या मोहिमेत शहर करसंकलन विभाग प्रमुख आर. पी. गायकवाड, एम. आय. बागवान, तेजस्विता कासार, आरती कांगरे, मनोज मंजरतकर, भीमा शिंदे, हद्दवाढ विभागाचे गोपाळ जोशी, बोल्लम, महिंद्रकर यांनी भाग घेतला. विशेष म्हणजे दूरसंचारच्या मोबाईल टॉवरची ८३ लाख थकबाकी आहे. मागील मोहिमेत शहरातील मोबाईल टॉवर सील करण्यात आल्याने मोबाईल सेवा विस्कळीत झाली होती. तरीही अद्याप दूरसंचार खात्याने थकबाकी भरलेली नाही, हे विशेष.
थकबाकी वसुलीसाठी नियुक्त केलेल्या पाच पथकांनी शहर विभागात २६ लाख ५४ हजार तर हद्दवाढ भागात १९ लाख ११ हजारांची अशी ४५ लाख ६६ हजारांची वसुली केली. शहरात ४ मिळकती सील केल्या, हद्दवाढ भागात एका मिळकतदाराचे नळ तोडले तर तिघांच्या मिळकती सील केल्या. १ ते २७ फेब्रुवारी अखेर ६ कोटी ५४ लाख १७ हजार ९०९ रुपयांची वसुली झाली तर ७० जणांचे नळ तोडण्यात आले आणि २३ जणांची मिळकत सील करण्यात आली आहे.