सिद्धेश्वर मंदिराभोवती १३०० पोलीस; तैलाभिषेकाच्या मार्गावरही चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 02:37 PM2021-01-12T14:37:52+5:302021-01-12T14:37:58+5:30
सुमारे तीनशे ते चारशे स्थानिक रहिवाशांना पोलीस आयुक्तालयाकडून पास देण्यात आले आहेत.
सोलापूर : श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंदिर परिसर व मिरवणूक मार्गावर तेराशे पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. नंदीध्वज मिरवणूक मार्गावरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, परिसरात राहणाऱ्या चारशे नागरिकांना पासेस देण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट कॉर्नर, हरीभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्ता, सिद्धेश्वर कन्या प्रशालेसमोरील रस्ता, वनश्री नर्सरी, विष्णू घाट, गणपती घाट, सरस्वती कन्या प्रशाला, भुईकोट किल्ल्याच्या आतील परिसर, चार हुतात्मा पुतळा या परिसरामध्ये दि.१२ जानेवारी रोजी रात्री १२ ते दि.१७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या परिसरात तेराशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, सहा पोलीस निरीक्षक, १२ सहायक पोलीस निरीक्षक, २० फौजदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंदोबस्त असणार आहे. याशिवाय क्यूआरटी पथक असणार आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू
- संचारबंदी लागू करण्यात आलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संबंधित फौजदार चावडी पोलीस ठाणे व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने पास देण्यात आले आहेत. पासव्यतिरिक्त कोणालाही या परिसरामध्ये प्रवेश करता येणार नाही. परिसरातील घरांमध्ये फक्त एका नागरिकाला पास देण्यात आला असून, तेथील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. सुमारे तीनशे ते चारशे स्थानिक रहिवाशांना पोलीस आयुक्तालयाकडून पास देण्यात आले आहेत.
शासनाच्या आदेशावरून श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी आदेशाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त.