बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:47+5:302021-02-05T06:49:47+5:30
ऑक्टोबरमध्ये राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रात व सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे माणनदीला आलेल्या पुरात बलवडी, चिणके, वाटंबरे, सांगोला व सावे ...
ऑक्टोबरमध्ये राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रात व सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे माणनदीला आलेल्या पुरात बलवडी, चिणके, वाटंबरे, सांगोला व सावे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे फुटून भगदाड पडल्याने मोठे नुकसान झाले होते. तर खवासपूर, लोटेवाडी, नाझरे, अनकढाळ, कमलापूर, वासुद, बामणी, वाढेगाव, मांजरी, व मेथवडे या बंधाऱ्यांनाही मोठी झळ पोहोचली होती.
पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बंधारे दुरुस्तीची कामे त्वरित करावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. तसेच जिल्हा नियोजन बैठकीतही हाच मुद्दा उपस्थित केल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक मुंडे यांच्याशी चर्चा करून सांगोला व पंढरपूर तालुक्यातील बंधारे दुरुस्तीसाठी सुमारे १४ कोटींचा निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, असे आदेश दिल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.