अरबी समुद्रातील १४ तासाची वादळाशी झुंज ठरली यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:44+5:302021-05-21T04:23:44+5:30
मंगळवेढा : ‘टायटॅनिक’ सिनेमामध्ये जे दृष्य ...
मंगळवेढा : ‘टायटॅनिक’ सिनेमामध्ये जे दृष्य दाखवण्यात आले, त्यापेक्षा अत्यंत विदारक आणि क्लेशदायक चित्र उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. स्वतःचा जीव वाचवण्याच्या आकांताने साडेचौदा तास अरबी समुद्रामध्ये तग धरून राहिल्यानंतर भारतीय नौदलाने येऊन त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे भारतीय नौदल त्यांच्यासाठी देवदूतच ठरले.
हा थरारक अनुभव मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील विश्वजित बंडगर या तरुणाला आला. मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील विश्वजित बंडगर या तरुणाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण करून सोलापूर येथे आयटीआयचा कोर्स केला. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात मुंबईला गेला. वेल्डिंग क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम करत असल्याने त्याला मुंबई येथील कंपनीमध्ये नोकरी मिळाली.
आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २७ वर्षीय विश्वजितला मुंबईसारख्या ठिकाणी नामांकित वेल्डर म्हणून कच्चे इंधन समुद्रतळातून बाहेर काढणाऱ्या जहाज कंपनीतील बार्जमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र स्वत:च्या आयुष्यात भयंकर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार, याची कसलीही कल्पना त्याला नव्हती. या घटनेने त्याला जबर धक्का बसला.
दरम्यान, या ठिकाणी तीनशेहून अधिक लोक काम करत होते. ज्याक्षणी हे वादळ येऊन धडकले, त्यावेळी समुद्राशी जोडून ठेवणाऱ्या त्या जहाजाच्या साधनाचे मोठे नुकसान झाले. साक्षात मृत्यूच डोळ्यासमोर उभा राहिल्याचे सहकाऱ्यांचे धाबे दणाणले.
समुद्रातल्या वादळामध्ये १४ तासापेक्षा अधिक काळ तरंगत राहताना जीवनरक्षक जॅकेटचा एक भाग तुटून गेला. डोक्याला जखम झाली. सोबत असणाऱ्या एका मित्राचे जॅकेट निघून गेले. त्याच्या हाताला हात देऊन लढा सुरू ठेवला. मृत्यूचे तांडव आणि जीव वाचविण्यासाठी सुरू असलेल्या मंगळवेढ्यातील या तरुणाच्या धडपडीपासून घरातले लोक अनभिज्ञ होते. दरम्यान, विश्वजितचा भाऊ विनोद याने चक्रीवादळाची कल्पना आल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला होता.
--
अन् समुद्रात उड्या घेतल्या
अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रामध्ये जीवनरक्षक जॅकेट घालून उड्या घेतल्या. काहीजण त्या चक्रीवादळाच्या तडाख्यात गायब झाले. अशात विश्वजितने हिंमत सोडली नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांना त्याने, काही होणार नाही, हे संकट काही काळासाठी आहे, असे सांगत जीवनरक्षक जॅकेट अंगावर चढवत समुद्रामध्ये उड्या घेतल्या. इथूनच त्यांच्या जीवन-मरणाचा संघर्ष सुरू झाला.
---
हेलिकॉप्टर अन् बचावकार्य
घडलेली घटना भारतीय नौदल विभागापर्यंत समजल्यानंतर त्यांच्याकडून मदतकार्य सुरू झाले.
समुद्रापासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि बचावकार्य करणारे पथक जहाजांच्या माध्यमातून पोहोचले. ७० फूटहूनही जास्त उंची असणारे नौदलाचे जहाज व नौदलातील सैन्याने जहाजातून रस्सी खाली टाकून आम्हाला जहाजात चढण्यासाठी प्रेरित केले. सतत चौदा तासापेक्षा जास्त काळ पाण्यात असल्यामुळे अंगात कोणत्याही प्रकारचा त्राण शिल्लक राहिला नव्हता.