ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून १४ लाखांची फसवणूक; अहमदनगरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Published: December 17, 2023 08:22 PM2023-12-17T20:22:27+5:302023-12-17T20:22:52+5:30
ऊसतोड मजूर पाठवून देण्याबाबत फोन केला असता आम्ही तुमच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन संशयितांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे दीपक गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सोलापूर: ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून रोख ७ लाख व बँक खात्यामार्फत ७ लाख असे १४ लाख घेऊन मजूर न पुरविता १४ लाखांची फसवणूक केल्याची घटना रविवारी समोर आली. याबाबत टेंभुर्णी पाेलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक आप्पासाहेब गायकवाड (वय ४०, रा. गायकवाड वस्ती, माळेगाव, ता. माढा) यांनी टेंभुर्णी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार राक्षसवाडी (ता. अहमदनगर) येथील सचिन दिनकर खरात (वय ४०), नितीन दिनकर खरात (४२), दीपक दिनकर खरात (वय ४५), अंबादास दिनकर खरात (४३) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या साखर कारखाने सुरू आहेत. टेंभुर्णी येथील साखर कारखान्यकडून सचिन, नितीन, दीपक, अंबादास, दिनकर या चौघांनी ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बदल्यात रोख ७ लाख व बँकेमार्फत ७ लाख असे १४ लाख रुपये घेऊन ऊसतोड मजूर न पुरविता १४ लाखांची फसवणूक केली.
ऊसतोड मजूर पाठवून देण्याबाबत फोन केला असता आम्ही तुमच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन संशयितांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे दीपक गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस संबंधितांचा शोध घेत आहेत. या घटनेची नोंद १५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा टेंभुर्णी पोलिस ठाण्यात झाली असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक शेख हे करीत आहेत.