सोलापूर शहरात गोवरचे १४ संशयित रुग्ण; उपचारानंतर बालके होताहेत बरे
By Appasaheb.patil | Published: December 6, 2022 02:51 PM2022-12-06T14:51:18+5:302022-12-06T14:51:52+5:30
लसीकरणावर सर्वाधिक भर; आरोग्य विभागाचे सर्वेक्षण सुरू
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : गोवर या संसर्गजन्य आजारांच्या संशयित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोलापूर शहरात १४ संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेने दिली, तर ग्रामीण भागात एकही संशयित रुग्ण आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले.
गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो. हा आजार होऊ नये यासाठी नऊ महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या आराेग्य विभागाकडून बालकांचे सर्वेक्षण सुरू असून, सर्वेक्षणातून माहिती संकलित करून गोवर-रूबेला लस देण्यात येत आहे. संशयित रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिका आरोग्य विभागाकडून त्याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. गोवर विरुद्धची लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ही लसदेखील खूप जास्त प्रभावी आहे. जर वेळीच बाळाला गोवरची लस दिली असेल, तर त्याला हा आजार होण्याची शक्यता अत्यंत कमी असते आणि म्हणूनच प्रशासनातर्फे वेळीच बाळांना गोवरची लस देण्याचा सल्ला दिला जातो.
ही लक्षणे दिसल्यास नागरी आरोग्य केंद्राला भेट द्या...
गोवर हा आजार म्हणजे एक फ्लू स्ट्रेन आहे. याची लक्षणे सामान्य फ्लूसारखीच असतात. ज्यामध्ये खूप जास्त ताप येतो, थकवा जाणवतो, खूप जास्त खोकला येतो, डोळे अगदी रक्तासारखे लाल लाल होतात. सतत नाक गळत राहते. गोवर आजारात अंगावर चट्टेसुद्धा येतात. जे डोक्यापासून सुरू होतात आणि मग शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरू लागतात. लक्षणे दिसून येताच पालकांनी बाळाला नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.