रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून १५ लाखांचा दंड वसूल
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 7, 2023 06:02 PM2023-05-07T18:02:31+5:302023-05-07T18:02:43+5:30
सोलापूर विभागाकडून तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात आली असून रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून आठ तासात पंधरा लाख रूपये दंड वसूल केला आहे.
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाकडून तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात आली असून रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून आठ तासात पंधरा लाख रूपये दंड वसूल केला आहे. शनिवार, ६ मे रोजी ही कारवाई करण्यात आली असून २३७५ फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई झाली आहे.
रेल्वेचे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली आहे. प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणे, रेल्वेत अस्वच्छता निर्माण करणे, धुम्रपाण करणे अशी नियमबाह्य कृत्ये केल्याबद्दल रेल्वेने १२२७ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ५२ हजार रूपये दंड वसूल केला आहे. शनिवारी, सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत ही मोहिम चालली असून एकूण २९ एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. यासोबत ४ खाद्य स्टॉल तसेच १९ विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.