यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत १५ टक्के वाढ
By admin | Published: May 23, 2014 12:52 AM2014-05-23T00:52:33+5:302014-05-23T00:52:33+5:30
कामगारांचा तिढा सुटला : अपर कामगार आयुक्तांनी केली तडजोड
सोलापूर : शहरातील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत १५ टक्के तर याच्याशी निगडित असलेल्या कामगारांना १३ टक्के वाढ देण्याचा निर्णय यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या बैठकीत अपर कामगार आयुक्त हेंद्रे यांनी जाहीर केला. त्यामुळे कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्न अखेर सुटला आहे. शहरातील यंत्रमाग कामगारांच्या वाढ मजुरीची मुदत दि. ३१ मार्च २०१४ रोजी संपलेली आहे. त्यामुळे यंत्रमाग धंद्यामध्ये काम करणार्या सिटू, मनसे, सेना, जयहिंद कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना यांनी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे वाढ मजुरीच्या संदर्भात प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यामुळे वाढ मजुरीसंदर्भात निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे अपर कामगार आयुक्त हेंद्रे यांनी गुरुवारी दुपारी २ वा. शासकीय विश्रामगृहात यंत्रमागधारक संघटना व यंत्रमागधंद्यात काम करणार्या सर्व ट्रेड युनियनची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीस प्रभारी सहायक कामगार आयुक्त मुजावर, यंत्रमागधारक संघटनेच्या वतीने पेंटप्पा गड्डम, राजगोपाल झंवर, जगदीश खंडेलवाल, राजू राठी, अंबादास बिंगी, संघटनेतर्फे माजी आमदार नरसय्या आडम, व्यंकटेश कोंगारी, प्रभाकर तेलंग, सूर्यकांत केंदळे, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, लक्ष्मण माळी आदी उपस्थित होते. बैठकीत सर्व संघटनेच्या वतीने १७.५ टक्के मजुरी वाढ देण्याची मागणी केली होती. मात्र यंत्रमाग मालक संघटनेच्या वतीने १0 टक्के वाढ देण्याचे सुचविले होते. दोन्ही बाजूच्या मागणीचा विचार करून अपर कामगार आयुक्त हेंद्रे यांनी तडजोड करून सर्व यंत्रमाग कामगारांना विव्हरसाठी (लूम कामगार) १00 कार्डास १५ टक्के व बँक प्रोसेसमध्ये काम करणार्या सर्व कर्मचार्यांना त्यांच्या पगारामध्ये १३ टक्के वाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. दि. १ एप्रिल २0१४ पासूनच्या फरकासहित वाढ मजुरी देण्याचा निर्णय झाला आहे.
-------------------------
कामगार एकजुटीची गरज... भविष्यकाळात किमान वेतन व स्पेशल अलाउन्ससह यंत्रमाग कामगारांना सर्व कामगार कायदे लागू करून घेण्यासाठी कामगार एकजुटीची गरज आहे, असे आवाहन यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. -----------------------------------
शासकीय विश्रामगृह येथे बोलावण्यात आलेल्या या बैठकीस गांधी नगर, एमआयडीसी भागातील कामगार अर्धी सुट्टी घेऊन आले होते, त्यामुळे थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन प्रचंड घोषणाबाजी झाली. अखेर अपर कामगार आयुक्तांनी ताबडतोब निर्णय जाहीर केल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
--------------------------------------
यंत्रमाग मालक संघटनेच्या वतीने १0 टक्के मजुरी वाढ देण्याची तयारी दर्शविली होती. आयुक्तांनी तडजोड करून ती १५ टक्क्यांवर नेली आहे. तडजोडीने मजुरीवाढीचा तिढा सुटला आहे. - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमाग मालक संघटना, सोलापूर.
-----------------------------
आयुक्तांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, मात्र यापुढील काळात प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, बोनस, हक्क रजा, शैक्षणिक शिष्यवृत्ती याही गोष्टींचा लाभ कामगारांना झाला पाहिजे अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करणार. - नरसय्या आडम, माजी आमदार.