गोविंद वृद्धाश्रमातील १५ ज्येष्ठांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:47+5:302021-05-05T04:36:47+5:30
२००२ पासून दशरथ देशमुख गोविंद वृद्धाश्रम चालवीत आहेत. या वृद्धाश्रमात बारामती, पंढरपूर, बार्शी, परांडा, नगर, अकलूज, श्रीपूर, कळंब, ...
२००२ पासून दशरथ देशमुख गोविंद वृद्धाश्रम चालवीत आहेत. या वृद्धाश्रमात बारामती, पंढरपूर, बार्शी, परांडा, नगर, अकलूज, श्रीपूर, कळंब, बावडा, कन्हेरगाव, बेंबळे, येडशी, कोंडीज, उपळाई (खु.) या गावांतील २२ स्त्री-पुरुष वास्तव्यास आहेत. टेंभुर्णी शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने वृद्धाश्रम चालक दशरथ देशमुख यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना बोलावून सर्व वृद्धांची कोरोना टेस्ट करून घेतली. तेव्हा २२ पैकी १५ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले, तसेच दशरथ देशमुख यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळून आले.
आता या सर्व वृद्धांवर कोठे आणि कसा उपचार करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली; परंतु कोरोनाबाधित झालेले वृद्ध निर्धास्त होते. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत नव्हते किंवा ते घाबरलेलेही नव्हते. शेवटी त्या १५ वृद्धांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. वृद्धाश्रम चालक देशमुख यांना अकलूज येथे खासगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.
कोविड केअर सेंटरमध्ये ठेवलेल्या १५ वृद्धांमध्ये ७ स्रिया व ८ पुरुषांचा समावेश होता. त्या सर्व वृद्धांना १० दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले होते. दरम्यानच्या काळात दीपक इंगळे या ७० वर्षीय वृद्धाची प्रकृती अचानक ढासळली. तेव्हा कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी इंगळे या वृद्धास सोलापूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना रुग्णवाहिकेतून सोलापूरला नेले, परंतु तेथे कोठेही बेड उपलब्ध नसल्याने परत टेंभुर्णी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार चालू केले. त्यांची वाचण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात होते; परंतु शेवटी दीपक इंगळे १५ दिवसांनी ठणठणीत बरे झाले.
कोरोनावर मात केलेले सर्वच्या सर्व वृद्ध मंडळी आता गोविंद आश्रमात गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत.
असा आहे सर्व वृद्धांचा दिनक्रम
वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ पहाटे पाचला उठून धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात. त्यानंतर सकाळी सगळ्यांना सुंठ टाकलेला कोरा चहा दिला जातो. नंतर बारा वाजेपर्यंत वैयक्तिक कामे केल्यावर जेवण व विश्रांती. पुन्हा पाच वाजता चहा, सहा ते सात धार्मिक कार्यक्रम व सात ते आठदरम्यान रात्रीचे जेवण, असा दिनक्रम असतो.
फोटो
०४टेंभुर्णी०१
ओळी
कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झालेले वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व दशरथ देशमुख.