कापड उत्पादकांचे दीडशे कोटी अडकले विदेशात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:22 AM2020-04-08T05:22:13+5:302020-04-08T05:22:22+5:30
कोरोनामुळे यंत्रमागधारक संकटात : रोजची पाच कोटींची उलाढाल ठप्प
बाळकृष्ण दोड्डी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : लॉकडाउन काळात तब्बल तेवीस दिवस यंत्रमाग उद्योग बंद राहणार असल्याने यंत्रमाग उद्योजकांसमोर महासंकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे देश-विदेशात लॉकडाउन सुरू असल्याने सोलापुरातील टेक्स्टाइल उत्पादकांची तब्बल दीडशे कोटी रुपयांची बिले अडकल्याची माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.
सोलापूर शहरातील सातशे यंत्रमाग कारखानदारांकडे १२ हजार यंत्रमाग आहेत. तब्बल ४0 हजार कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार कापड उद्योगातून निर्माण होतो. या उद्योगात दररोज जवळपास पाच कोटींची उलाढाल होत असते.
२३ मार्चपासून सोलापुरातील कापड उद्योग बंद आहे. १४ एप्रिलपर्यंत तब्बल तेवीस दिवस यंत्रमाग बंद राहणार आहेत.
१४ एप्रिलनंतरही लॉकडाउन सुरू राहण्याची भीतीदेखील यंत्रमागधारकांमध्ये आहे. लॉकडाउनच्या महिनाभर आधी निर्यात केलेल्या मालाचे पैसे
अद्याप येथील कापड उत्पादकांना मिळालेले नाहीत.
त्यामुळे येथील उद्योजकांची आर्थिक कोंडी होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून नवीन आॅर्डर नसल्याने तसेच येत्या १४ तारखेनंतरही लॉकडाउन सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योजक भीतीच्या सावटाखाली आहेत.
सोलापुरी चादर, टॉवेल्सची या देशात होते निर्यात
इराण, इराक, सौदी अरेबिया, दुबई यांसारख्या आखाती देशात तसेच युरोप, जर्मनी, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशात सोलापुरी चादरी आणि टॉवेलची मोठी के्रझ आहे. प्रतिवर्षी पाचशे कोटींहून अधिक निर्यात या देशांमध्ये होते. एकूण उलाढालीपैकी ५0 ते ६0 टक्के निर्यातीवर येथील उद्योग अवलंबून आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांकडे सीझन म्हणून पाहिले जाते. या काळातच कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे कापड उद्योजकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.