दुपार आणि रात्रीच्या तापमानात १६ अंशाची तफावत; आज ४१.१ अंश सेल्सिअसची नोंद
By शीतलकुमार कांबळे | Published: April 25, 2024 06:45 PM2024-04-25T18:45:26+5:302024-04-25T18:45:42+5:30
एप्रिल महिन्यात वाढत जाणारे तापमान आणि रात्री पडणारा पाऊल याचा परिणाम हवामानावर होत आहे.
सोलापूर : एप्रिल महिन्यात वाढत जाणारे तापमान आणि रात्री पडणारा पाऊल याचा परिणाम हवामानावर होत आहे. त्यामुळे कमाल व किमाम तापमानात १६ अंशाची तफावत जाणवत आहे. गुरुवार २५ एप्रिल रोजी ४१.१ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. याचा परिणाम आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, डोकेदुकी अशा तक्रारी सोलापूरकर करत आहेत.
रात्री आणि पहाटे वातावरणात असलेला गारवा आणि दुपारी उन्हाच्या झळांचा अनुभव सोलापूरकर सध्या घेत आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात तब्बल १६ अंशांचा फरक आहे. किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत जाणवत असून दिवसा उन्हाचा चटका सध्या जाणवत आहे. वातावरणात फारशी आर्द्रता नसल्याने कोरड्या झळांचा त्रास होत आहे. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कमी अधिक प्रमाणात रात्री दमट वातावरण असते. पावसामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा असतो. त्यामुळे एकाच दिवसात गारवा आणि उकाड्याचा अनुभव सोलापूरकर घेत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २५ ते २९ एप्रिल दरम्यान फक्त २७ एप्रिल रोजीच पाऊस पडणार आहे. त्यामुळे २७ एप्रिल पर्यंत तापमानात वाढ होऊन पुन्हा तापमानात घट होईल. २७ एप्रिल नंतर पावसाची शक्यता नसल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल व किमान तापमानात आणखी तफावत होण्याचा अंदाज आहे.