मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क
By दिपक दुपारगुडे | Updated: May 2, 2024 19:43 IST2024-05-02T19:41:43+5:302024-05-02T19:43:12+5:30
मंगळवेढा तालुक्यातील ४१ गावांमध्ये गृहभेटीद्वारे मतदानाची प्रकिया राबविण्यात आली.

मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क
दीपक दुपारगुडे, सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवेढा तालुक्यातील ८५ वयापेक्षा जास्त व दिव्यांग अशा १६३ मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला.
२७ व २८ एप्रिल रोजी मंगळवेढा तालुक्यातील ४१ गावांमध्ये गृहभेटीद्वारे मतदानाची प्रकिया राबविण्यात आली. यामध्ये ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या १५३ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग मतदारांनी मतदान केले. मंगळवेढा तालुक्यात एकूण १७१ जणांनी गृहभेटीद्वारे मतदान करण्यासाठी आपल्या बीएलओमार्फत फॉर्म नंबर १२ ड भरला होता. त्यात १६० मतदार ८५ वयापेक्षा जास्त होते. तर ११ मतदार दिव्यांग होते. त्यापैकी १५३ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग मतदारांनी अशा १६३ जणांनी मतदान केले. गृहभेटीवेळी पथक दोनवेळा मतदाराच्या घरी जाऊनही ८ मतदार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे मतदान घेता आले नाही.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान घेण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात ८ पथके स्थापन केली होती. यामध्ये एकूण ५६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यात पथक प्रमुख म्हणून नरळे, दुधाळ, डोरले, बाबर, मेटकरी, पुजारी यांचा सहभाग होता. ही प्रकिया सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार मदन जाधव, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.