राज्यात गाळप परवाने १७५ कारखान्यांना; मात्र सुरू झाले फक्त १३१ कारखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 05:15 PM2021-11-18T17:15:16+5:302021-11-18T17:15:19+5:30

९८ लाख मेट्रिक टन गाळप; पुढील महिन्यात १९० कारखाने सुरू होण्याचा अंदाज

175 mills in the state; But only 131 factories were started | राज्यात गाळप परवाने १७५ कारखान्यांना; मात्र सुरू झाले फक्त १३१ कारखाने

राज्यात गाळप परवाने १७५ कारखान्यांना; मात्र सुरू झाले फक्त १३१ कारखाने

Next

सोलापूर : दिवाळी सणानंतर राज्यात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला आहे. सोमवारपर्यंत १३१ साखर कारखान्यांचे ९८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. डिसेंबर महिन्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मंगळवारपर्यंत १७५ कारखान्यांना परवाने दिले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

राज्य शासनाने १५ ऑक्टोबरपासून जरी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पावसामुळे कारखाने सुरू होण्यास उशीर झाला आहे. दिवाळी अगोदर जवळपास १०० कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. दिवाळीनंतर ५० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असल्याचे सांगण्यात आले. मात्र एफआरपी चुकती केली नसल्याने कारखाना सुरू केल्याचे दाखविले जात नाही. साखर आयुक्त कार्यालयाकडे १३१ साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती दिली आहे. या १३१ साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत ९८ लाख मेट्रिक टन गाळप केले असून ८४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

ऊस तोडणी यंत्रणा तसेच इतर कारणांमुळे परवाना घेतलेल्या अनेक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले नाही. शिवाय काहींनी कारखाने सुरू केले, मात्र मागील वर्षीची एफआरपी दिली नसल्याने गाळप सुरू केल्याचे कळविले जात नाही. डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील व ऊस गाळपाला अधिक वेग येईल, असे सांगण्यात आले.

सोलापूर विभागाचे सर्वाधिक कारखाने

सध्या सोलापूर विभागातील २९, कोल्हापूर विभागातील २८, पुणे विभागातील २५, अहमदनगर विभाग १८, नांदेड विभाग १६, औरंगाबाद विभाग १३, अमरावती विभागात दोन कारखाने सुरू झाले तर नागपूर विभागात एकही कारखाना सुरू झाल्याची नोंद नाही.

कारखाने सुरू मात्र...

सोलापूर जिल्ह्यातील शंकर सहकारी, सिद्धेश्वर कुमठे, ओंकार, भीमा सहकारी टाकळी सिकंदर, सांगोला, सिद्धनाथ, लोकमंगल बिबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे या सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाला सादर केली नाही.

Web Title: 175 mills in the state; But only 131 factories were started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.