वाळू उपशाने तेलगावात उडाला भडका मोडतोड, सरपंचासह १८ जणांवर गुन्हा
By admin | Published: May 6, 2014 09:18 PM2014-05-06T21:18:49+5:302014-05-07T00:07:58+5:30
दक्षिण सोलापूर : वाळू उपशाला तेलगाव ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही महसूल प्रशासनाने ठेकेदाराला पोलीस बंदोबस्तात वाळू साठ्याचा ताबा दिला आणि तेलगावामध्ये पुन्हा एकदा संघर्षाचा भडका उडाला. तोडफोडीसाठी गाव नदीपात्रात उतरले. मारहाणप्रकरणी सरपंचासह १८ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
दक्षिण सोलापूर : वाळू उपशाला तेलगाव ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही महसूल प्रशासनाने ठेकेदाराला पोलीस बंदोबस्तात वाळू साठ्याचा ताबा दिला आणि तेलगावामध्ये पुन्हा एकदा संघर्षाचा भडका उडाला. तोडफोडीसाठी गाव नदीपात्रात उतरले. मारहाणप्रकरणी सरपंचासह १८ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू वाहतुकीमुळे रस्ता खराब होत असल्याची तेलगाव ग्रामस्थांची तक्रार होती. त्यामुळे लिलावाला विरोध दर्शविण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले होते. चार दिवसांच्या उपोषणानंतर जिल्हाधिकार्यांनी रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.
शनिवारी तहसीलदारांनी ठेकेदाराला तेलगाव साठ्याचा ताबा दिला आणि संघर्षाची ठिणगी पडली. ग्रामस्थांनी नदीपात्रात धाव घेतली आणि वाळू उपसा करणारी बोट नष्ट केली, पत्रा शेड तोडले, याकामी महिलाही रस्त्याावर उतरल्या. गावात गेल्या दोन दिवसात प्रचंड तणाव होता.
सोमवारी ग्रामस्थ आणि वाळू ठेकेदारांची माणसे समोरासमोर आली. अनिल भीमराव घाडगे (वय ४३, रा. कल्याणनगर भाग - १) यांच्यावर तलवार, हंटर आणि कुर्हाडीने हल्ला केल्याची फिर्याद मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आली.
याप्रकरणी सरपंच श्रीशैल पाटील, भाजपचे सरचिटणीस विजयकुमार बिराजदार, श्रीकांत चलवदे, भीमाशंकर बिराजदार, आमसिद्ध कोळी, शरणप्पा कोळी, आप्पासाहेब बिराजदार, सुरेश पाटील, महादेव कोळी, राजू राजमाने, रामा माशाळे, लगमण्णा कोळी, मल्लिकार्जुन पाटील, रुपेश बिराजदार, लक्ष्मण धोंडप्पा पुजारी, सुरेश कोळी, चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ कांबळे (वडापूर) या १८ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत सरपंच श्रीशैल पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी तुम्ही वाळू उपसा करायचा नाही. वाळू उपसा करणार असाल तर आम्हाला हप्ता द्या, असा दम भरल्याचे अनिल घाडगे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.