आंतरजातीय विवाह करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील १८१ जणांना मिळाले ९० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 04:24 PM2020-11-24T16:24:19+5:302020-11-24T16:26:31+5:30
विवाह प्रोत्साहन योजना : राज्य सरकारकडून निधी मिळण्यास अडचण
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : गतवर्षी २०१ वधू-वरांनी आंतरजातीय विवाह केला. पन्नास हजार रुपयांच्या शासकीय अनुदानासाठी २०१ दाम्पत्यांनी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला. यातील १८१ दांपत्य योजनेच्या अनुदानासाठी पात्र ठरले. उर्वरित २० दांपत्य विविध त्रुटीअभावी अपात्र ठरले. १८१ लाभार्थींना ९० लाख १५ हजारांचे अनुदान मिळाले.
मागासवर्गीय तसेच सवर्ण वर्गातील वधू-वरांचा विवाह झाल्यास आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारकडून विशेष अनुदान दिले जाते. चालू वर्षात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ४० दाम्पत्य पात्र ठरले आहेत. राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने या ४२ लाभार्थीं चालू वर्षात अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.
आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने योजनेला खीळ
या योजनेतील लाभार्थीना केंद्र सरकारकडून २५ हजार तसेच राज्य सरकारकडून २५ हजार असे एकूण पन्नास हजारांचे अनुदान मिळते. चालू वर्षात पात्र लाभार्थी करिता राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त झाले नाही. केंद्र सरकारचे २४ लाख रुपयांचे अनुदान शिल्लक असल्याचे प्रशासनाने सांगितले.
याेजनेचा लाभ कोणाला?
मागासवर्गीय तसेच सवर्ण वर्गातील वधू-वरांचा एकमेकांशी विवाह झाल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. सदर वधू वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. मुलीचे वय १८ वर्ष तसेच मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असावे. दोघांचाही प्रथम विवाह असावा. यासह अन्य कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार आहे.