सोलापूर जिल्ह्यातील ४०७ धनदांडग्याकडे १९ कोटी ४७ लाखांचे वीज बिल थकले
By Appasaheb.patil | Published: February 18, 2021 05:11 PM2021-02-18T17:11:26+5:302021-02-18T17:11:37+5:30
महावितरणला आर्थिक फटका- वसुलीसाठी अधिकाऱ्यांचे जोरदार प्रयत्न
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - मागील १० महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी एकदाही वीज बिल न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे या थकबाकीदारांचा वीज पुरवठा तोडून वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात १ लाखांहून अधिक वीजबिल असलेल्या ७०४ ग्राहकांकडे १९ कोटी ४७ लाख ९१ हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.
कोरोनामुळे देशभरात मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. याकाळात मोठमोठ्या कंपन्या, दुकाने, कार्यालये आदी विजेचा जास्त वापर असलेली आस्थापने बंद होती. सर्वकाही बंद असल्याने लोक घरातच होते. त्यामुळे घरगुती विजेचा वापर वाढला होता. लाॅकडाऊन काळात जनता घरात असताना महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता परिश्रम घेत होते. घरगुती ग्राहकांची वीज मागणी रेकाॅर्डब्रेक होती. त्यात रिडिंग व वीज बिलाची छपाई बंद असल्याने ग्राहकांना छापील बिलाऐवजी मोबाईल मॅसेजवर बिले देण्यात आली. ही बिले सरासरीने व कमी होती. प्रत्यक्षात जून महिन्यापासून रिडिंग सुरू होताच रिडिंगनुसार बिले देण्यात आली. मात्र, यापूर्वीची बिले न भरल्याने थकबाकी हप्ते करण्यात आले. एकरकमी भरणाऱ्यांना सवलत देण्यात आली. मात्र तरीही बिल माफ होईल या आशेने ग्राहकांनी बिले भरली नाहीत. आता थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.
थकबाकीत औद्योगिक वीजग्राहक नंबर १
सोलापूर जिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपन्या अद्याप म्हणाव्या तशा रुळावर आल्या नाहीत. त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी औद्योगिक वीजग्राहक तयार होताना दिसत नाही. ३६३ ग्राहकांकडे १२ कोटी ६५ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल त्वरित भरणा करा यासाठी महावितरणने कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.
सर्वाधिक थकबाकी सोलापूर ग्रामीण विभागात
सोलापूर मंडल हे बारामती परिमंडलांतर्गत येतो. सोलापूर जिल्ह्यात अकलूज, बार्शी, पंढरपूर, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर असे विभाग आहेत. १ लाखांच्या पुढे सर्वाधिक थकबाकीत सोलापूर ग्रामीण विभागाचा पहिला क्रमांक लागतो. या विभागात १८६ ग्राहकांनी ५ कोटी ७१ लाख ९६ हजार रुपयांची थकबाकी भरली नाही. याशिवाय बार्शी विभागात १४७ ग्राहकांनी ४ कोटी ७६ लाख ५२ हजार, पंढरपूर विभागात १५९ ग्राहकांनी ४ कोटी ७१ लाख ९६ हजार, सोलापूर शहरातील १४६ ग्राहकांनी ३ कोटी १६ लाख १३ हजार व सार्वजनिक सेवेतील ४३ ग्राहकांनी १ कोटी ९ लाख रूपये थकविले आहेत.
शासकीय कार्यालये, शाळा, दवाखानेही थकबाकीदार
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा, दवाखाने हे महावितरणच्या सार्वजनिक सेवा वीजग्राहक प्रकारात येतात. सार्वजनिक सेवेतील ४३ बड्या ग्राहकांनी १ कोटी ४ लाख ३२ हजार रूपयांची वीजबिल थकविले आहे.
घरगुती, औद्योगिक, शेतीपंप, व्यापारी व सार्वजनिक सेवेतील वीजग्राहकांकडे असलेली थकबाकी वसुलीसाठी जिल्हा, तालुका, शाखा स्तरावर पथकांची नियुक्ती केली आहे. वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. ग्राहकांनी आपल्याकडे असलेली थकबाकी भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे.
- ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल.