गोदामात ठेवलेली शेतकऱ्याची १९ लाखांची तूर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:58+5:302021-02-25T04:27:58+5:30
नरहरी अंधारे यांची माणकेश्वर शिवारात २०१९-२०२० मधील खरीप हंगामात ४५ एकर जमिनीत पांढरी तुरीची पेरणी केली होती. त्यात ...
नरहरी अंधारे यांची माणकेश्वर शिवारात २०१९-२०२० मधील खरीप हंगामात ४५ एकर जमिनीत पांढरी तुरीची पेरणी केली होती. त्यात तुरीचे २५ टन ७९५ किलो उत्पन्न झाले. त्यांनी १० व १९ फेब्रुवारी रोजी ही तूर बार्शी बाजार समितीतील व्यापारी किरण बाळासाहेब शिराळ यांच्या आडत दुकानावर विकण्यासाठी आणली. त्यावेळी तुरीचा भाव ४५०० ते ४७०० प्रतिक्विंटल होता. त्यामुळे अंधारे यांनी ७५०० भाव येईल, तेव्हाच तूर विकायची, असे शिराळ यांना सांगितले. त्यावेळी शिराळ यांनी भाव येण्यास पाच ते सात महिने वेळ लागेल, तोपर्यंत ओळखीचे संतोष बागमार यांच्या भोयरे येथील वामा वेअर हाऊस येथे ठेवू, असे सांगितले व तूर तेथे ठेवल्या.
त्याबाबत तेथील रजिस्टरवर नोंदी आहेत. माल ठेवल्याची पावती मागितली असता तेव्हा पावती बुक संपले आहे, दोन दिवसात पावती देऊ, असे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर एका आठवड्याने संतोष बागमार यांना माल ठेवल्याची पावती मागितली. त्यांनी शिराळकडे दिल्याचे सांगितले. त्यानंतर शिराळ याने पावती घरी आहे, असे सांगून देण्यास टाळाटाळ केली.
सध्या शिराळचा काही ठावठिकाणा नाही. वेअर हाऊसमधून त्यांच्या नावावर ५ व ६ ऑगस्ट रोजी तूर नेल्याची नोंद आहे. मात्र त्या पावतीवर त्यांची सही नाही. ठेवलेल्या तुरीची आज बाजारात किंमत १८ लाख ७५ हजार रुपये आहे. त्यामुळे वरील दोघांनी संगनमत करुन
आपली तूर हडप करुन आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद अंधारे यांनी दिली. याचा पुढील तपास तालुका सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.
लॉकडाऊनचा फटका, विश्वास नडला
लॉकडाऊन सुरु झाल्याने अंधारे यांना बार्शीला येता आले नाही. नंतर पावती माझ्याकडे सुरक्षित आहे, काळजी करू नका, असे किरण शिराळ म्हणत होता. त्याच्याबरोबर अनेक वर्षापासून व्यवहार असल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला. तुरीचा भाव ७३०० रुपये झाल्याचे समजल्याने ते शिराळकडे गेले. पण त्याचे दुकान बंद होते. म्हणून वेअर हाऊसला तूर आणण्यास गेले तर त्यांनी तूर देण्यास नकार दिला.