दुकानासाठी २ लाख अन् मुलगा म्हणून वारस न दिल्यानं पतीने दिली पत्नीला घटस्फोटाची धमकी
By शीतलकुमार कांबळे | Published: August 25, 2023 06:55 PM2023-08-25T18:55:39+5:302023-08-25T18:55:43+5:30
फिर्यादीच्या आईस सांगलीला बोलावून घेऊन तिचा अपमान करून शिवीगाळ, दमदाटी करून हाकलून दिले.
सोलापूर - इलेक्ट्रिक दुकानासाठी दोन लाख रूपये आई-वडिलांकडून घेऊन ये नाहीतर घटस्फोट देईन अशी धमकी पतीने पत्नीला दिली. याबाबतची तक्रार बुधवार पेठेतील विवाहित महिलेने पोलिसात दिली असून याप्रकरणी सांगलीच्या सहा जणांविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पती सागर बिनवडे, सासू मंगल बिनवडे, सासरे प्रकाश बिनवडे, नणंद रूपाली गोर्हे, दिपाली शिके (रा. लक्ष्मी नगर, जुना बुधगाव रोड, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. याबाबत सुप्रिया सागर बिनवडे (वय २२, रा. जय मल्हार चौक, साठे चाळ, बुधवार पेठ, सोलापूर यानी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीस तु आमचे ऐकत नाही, तू आमच्या वंशाला वारस म्हणून मुलगा दिला नाही तसेच इलेक्ट्रिक दुकानाकरिता २ लाख रूपये आई-वडिलांकडून घेवून ये नाहीतर घटस्फोट दे म्हणत पती सागर याने धमकी दिली.
याचवेळी फिर्यादीच्या आईस सांगलीला बोलावून घेऊन तिचा अपमान करून शिवीगाळ, दमदाटी करून हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादी तिची मुलगी शालिनी (वय ४) हिच्यासह माहेरी सोलापूर येथे राहण्यास आली असून तेव्हापासून फिर्यादी हिस वारंवार संपर्क करून नांदविण्यास घेवून जाणयाकरिता विनंती केली, परंतू जोपर्यंत २ लाख रूपये घेवून येत नाही तोपर्यंत तू आमच्याकडे नांदण्यास यायचे नाही असे म्हणून फिर्यादीस सासरी घेवून जाण्यास नकार दिला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.