वाळू ठेकेदाराला २0 कोटी दंडाची नोटीस
By admin | Published: May 24, 2014 01:22 AM2014-05-24T01:22:38+5:302014-05-24T01:22:38+5:30
महसूल विभागाचा दणका: २१ हजार ब्रास अनधिकृत वाळूचा उपसा
पंढरपूर :शेळवे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदी पात्रात वाळूचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने ठरवून दिलेल्या साठ्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणचा २१ हजार ब्रासचा उपसा केल्याचे पंचनाम्यात उघड झाले. या प्रकरणी महसूल विभागाने त्या ठेकेदाराला २0 कोटी रूपये दंडाची नोटीस धाडली आहे. शेळवे येथील भीमा नदी पात्रामध्ये भागवत श्रीमंत चौगुले यांच्या यशवंत इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीला ठेका दिला होता. ठेकेदाराने ठरलेल्या गट नंबरऐवजी शेजारील गट नंबर दोनमधूनही २१ हजार ९३ ब्रास वाळू उपसा केल्याचे पंचनाम्यात उघड झाले. यामुळे शेळवेत अधिकृत वाळू ठेकेदार आणि दमदाटी करून वाळू उपसा करणारे व ग्रामस्थ एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यानंतर हा प्रकार उघड झाल्याने ठेकेदाराला दंडाची नोटीस पाठविण्यात आली आहे. शेळवेत वादावादीचे रूपांतर जाळपोळीत झाले. एक पोकलेन, दोन जेसीबी, तीन टिपर, नऊ मोटरसायकली, लॅपटॉप जाळण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ३८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल होऊन आठ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान नायब तहसीलदार एम. पी. मोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा मंडल अधिकारी व्ही. पी. देशपांडे व तलाठी खडतरे यांच्यामार्फत केला असता वाळू ठेकेदाराने गट नं. एकमधून नियमबाह्य वाळू उपसा केल्याचे आढळून आले. याशिवाय गट नं. दोनमधूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याचे आढळून आल्याचे नायब तहसीलदार मोरे यांनी सांगितले.
---------------------------
घडलेल्या घटनेबाबत अधिकार्यांकडून चौकशी करून, दोषींवर कारवाई करणार असून, ठेकेदार मोठी रक्कम देऊन ठेका घेत असल्याने त्यांना संरक्षण देण्यात येईल. चोरटी वाळू वाहतूक करणार्यांवर आळा बसला नसल्याने यावर कारवाई करून नदी काठावर असलेल्या वाहनांचा वापर कशासाठी होतोय, याची आर. टी. ओं. कडून चौकशी केली जाईल. सत्यता पडताळून दोषी आढळल्यास कारवाई करणार आहे. —डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी
-----------------------------------
अनधिकृत वाळू उपशाचा पंचनामा करून संबंधित वाळू ठेकेदाराला २0 कोटी रूपयांच्या दंडाची नोटीस देण्यात आली आहे. २४ तासांत ठेकेदाराने म्हणणे सादर न केल्यास दंड कायम केला जाईल. - एम. पी. मोरे, नायब तहसीलदार, पंढरपूर
---------------------------------
नायब तहसीलदारांचा घूमजाव ४ठेकेदारांनी अधिकृत वाळू उपसा केल्याप्रकरणी दंडाची नोटीस पाठविली आहे. ही नोटीस ठेकेदारांना अद्याप मिळालेली नाही. नोटीस पोस्टाने पाठविली असून मिळाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणणे सादर करण्याची मुदत दिली असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले होते. मात्र काही वेळाने ही नोटीस पाठविलीच नाही. आपण पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी घूमजाव केला आहे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.