आयकर विभागाकडून २० तास तपासणी; सराफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:12+5:302021-03-21T04:21:12+5:30
कोल्हापूरच्या कार्यालयास उपस्थित राहण्याचे आदेश अक्कलकोट : लाखो रुपयांचे चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून अक्कलकोटचे सराफ व्यापारी श्रेणिक कासार यास ...
कोल्हापूरच्या कार्यालयास उपस्थित राहण्याचे आदेश
अक्कलकोट : लाखो रुपयांचे चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून अक्कलकोटचे सराफ व्यापारी श्रेणिक कासार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पुणे येथील पोलिसांनी केली. दुसऱ्या आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत २० तास तपासणी करून पथक पुण्याकडे रवाना झाले. या सराफास बँक स्टेटमेंट घेऊन कोल्हापूरच्या कार्यालयास उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.
पुणे येथील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक मोठा दरोडा पडला होता. यात एका घरातील मोठे घबाड चोरीला गेले होते. या घटनेत अटकेत असलेल्या आरोपींनी चोरीचे सोन अक्कलकोट येथे विक्री केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यावरून संबंधित आरोपीला शुक्रवारी दुपारी अक्कलकोट येथे आणण्यात आले. उत्तर पोलीस ठाण्यामार्फत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला बाजारपेठेत फिरविले. यावेळी त्याने श्रुती ज्वेलर्सचे दुकान दाखवले. त्यावरून दुकानाचे मालक श्रेणिक कासार यास ताब्यात घेऊन पुण्यास नेले आहे. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली. या पथकामध्ये एक अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी होते.
एकाच दिवशी सोने विकणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर वेगवेगळी कारवाई झाल्याने व्यापारी वर्गातून खळबळ उडाली आहे.
---
बँक स्टेटमेंट सादर करण्याचे आदेश
शुक्रवारी अक्कलकोट शहरातील आणखी एका ज्वेलर्स दुकानावर यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली होती. तब्बल २० तास दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानदाराचे सीए व त्यांचे कायदेशीर सल्लागार वकील उपस्थित होते. सर्व कागदपत्रांची तपासणी करून हे पथक शनिवारी सकाळी ८ वाजता पुण्याकडे रवाना झाले. जाताना अभिनंदन यांना बँकेचे स्टेटमेंट घेऊन कोल्हापूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केल्याचे सांगण्यात आले.
---
नेहमीच त्रास, व्यापाऱ्यांची नाराजी
अक्कलकोट येथे लहान- मोठे असे मिळून तब्बल २५ ते २६ सोने-चांदीचे दुकानदार आहेत. त्यामध्ये मोठे ६ जण आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही जण नेहमी चोरीचे सोने, चांदी पारधी लोकांकडून घेतात, असा समज असला तरी अशा घटनेमुळे स्वच्छ, पारदर्शक व्यापार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना नेहमी त्रास होत असल्याची नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.