सोलापुरात अतिवृष्टीमुळे मिरचीच्या दरामध्ये २० टक्के वाढ
By दिपक दुपारगुडे | Published: March 26, 2023 12:09 PM2023-03-26T12:09:21+5:302023-03-26T12:09:31+5:30
लाल तिखटाचे चटके जिभेला अधिकच झणझणीत !
दीपक दुपारगुडे, सोलापूर : वर्षभर घरात लागणाऱ्या तिखटाची बेगमी म्हणून दर वर्षी उन्हाळय़ाच्या हंगामात तयार करण्यात येणाऱ्या मसाल्याला यंदा २० टक्के दरवाढीमुळे लाल तिखटाचे चटके जिभेला अधिक लागण्याची चिन्हे आहेत. मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिरचीचे दर गतवर्षीच्या तुलनेत वाढल्यामुळे वर्षभराचा मसाला बनवणाऱ्या गृहिणी हैराण झाल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातून येणारी मिरची ची आवक घटली असल्यामुळे दर वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हल्ली बाजारात सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो. गेल्या चार महिन्यांपासून वातावरणातील बदलांचा अनेक पिकांवर परिणाम झाला आहे. काही पिकांची नासधूसही झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका मिरचीला बसल्याचे चित्र आहे.
आंध्र, तेलंगणातील मिरचीची आवक कमी
आंध्र प्रदेश, तेलंगणा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात. दरवर्षी या भागातील मिरची सोलापूरच्या बाजारपेठेत येत असते. शेतकऱ्याकडून ट्रकमधून मिरची आणून त्याची विक्री करतात. मात्र यंदा या त्या राज्यांमध्येच मिरचीची लागवड कमी प्रमाणात झाल्यानं बाजारपेठेत लाल मिरचीची आवक थंडावली आहे.
असे आहेत दर
तेजा- २३०-२४०
गुंटूर - २००-२३०
बॅडगी - ४५०-५५०
इंडोफाईव्ह - २००-२३०
शंकेश्वरी -२३०-२५०
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"