२० वर्षे विठ्ठलाची सेवा... आता मुख्यमंत्र्यांसह सपत्निक पूजा करायचा मिळाला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:37+5:302021-07-17T04:18:37+5:30
आषाढी एकादशी दिवशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते सपत्निक केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी मानाचा ...
आषाढी एकादशी दिवशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते सपत्निक केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी मानाचा वारकरी विठ्ठलाच्या दर्शन रांगेतून निवडला जातो. पण सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१) व इंदुबाई केशव कोलते (६६, दोघे रा. संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिरपाठीमागे वर्धा, जि. वर्धा) या दाम्पत्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला आहे.
केशव कोलते हे गेली २० वर्षांपासून मंदिरातच राहतात. यावेळी समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
चिठ्ठीद्वारे झाली निवड
श्री विठ्ठल मंदिरात आठ विणेकरी पहारा देण्याची सेवा करतात. त्यापैकी दोन विणेकऱ्यांना गतवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संधी मिळाली होती. तसेच चार विणेकऱ्यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी आहे. यामुळे केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठीने निवड करण्याचे मंदिर समितीने ठरवले. त्यानुसार चिठ्ठीद्वारे केशव शिवदास कोलते यांची शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्यात आली.