'पाणीपुरवठा'च्या २०७४ वीज जोडण्या खंडित होणार; दोन लाख वीजग्राहकांच्या घरात अंधार पडणार
By Appasaheb.patil | Published: March 14, 2024 05:17 PM2024-03-14T17:17:08+5:302024-03-14T17:18:51+5:30
नियमानुसार तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिला.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ झाली असून, महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे मागील थकबाकीसह चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करावीच लागणार आहे. जे ग्राहक थकबाकीदार आहेत त्यांचा नियमानुसार तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिला.
पाणीपुरवठा योजनेच्या २०७३ थकीत जोडण्यांवर १३० कोटींची थकबाकी असून वेळेत बिल न भरल्यास त्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने सांगितले.
थकबाकी वसुलीसह चालू महिन्यांचे वीजबिल १०० टक्के वसूलीचे ध्येय ठेऊनच काम करावे लागणार आहे. त्यामुळे वारंवार आवाहन करूनही वीज बिल भरण्यास प्रतिसाद देत नाही अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्याची कारवाई करावी. यासाठी मंडलअंतर्गत कार्यालयांतील मनूष्यबळाचे नियोजन करण्यात यावे तसेच आवश्यक तेथे पोलीस संरक्षण घेण्यात यावे असेही अंकुश नाळे यांनी सांगितले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात सध्या १ लाख ९८ हजार २१० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सध्या २९ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर दिवाबत्तीच्या ५५०५ वीजजोडण्या थकीत आहेत यांच्याकडे २६४ कोटी व पाणीपुरवठा योजनेच्या २०७३ थकीत जोडण्यांवर १३० कोटींची थकबाकी आहे.