२१ दूध संघ केंद्र जूनपासून बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:45+5:302021-05-29T04:17:45+5:30
दूध संकलन वाढीसाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध संकलन केंद्र सुरू केली होती. या संकलन केंद्राने भेसळयुक्त ...
दूध संकलन वाढीसाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध संकलन केंद्र सुरू केली होती. या संकलन केंद्राने भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला तर कारवाई करण्यासाठी अडचण येत आहे. जिल्हाभरात अशा संकलन केंद्रांची संख्या ९० इतकी झाली होती. वरचेवर संकलन केंद्र बंद पडू लागली व अनावश्यक केंद्र बंदही करण्यात आली.
सध्या ७ तालुक्यात २१ संघ केंद्र सुरू आहेत. या संघ केंद्रातून प्रतिदिन २९०० लिटर दूध संकलन होत आहे. ही सर्व संकलन केंद्र बंद करण्याची नोटीस जिल्हा दूध संघाने बजावली आहे. येत्या १ जूनपासून ही संघ केंद्र बंद करण्यात येणार आहेत.
पशुखाद्य व गाय खरेदीसाठी घेतलेली रक्कम न भरणाऱ्या ८ संस्थांवर आतापर्यंत कारवाई केली जात नव्हती. यापैकी सहा संस्थांना रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे. सोनाई मंगळवेढा व लोकसेवा शेटफळ या दूध संस्थांची कागदपत्र जमवाजमव सुरू असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सहा संस्थांना नोटीस बजावली आहे.
----
इथे आहेत संघ केंद्र
२१ संघ केंद्रामध्ये सर्वाधिक १० केंद्र उत्तर सोलापूर तालुक्यात आहेत. पुनानाका, कुमारचौक,बेलाटी, तिऱ्हे, पाथरी, डोणगाव येथे प्रत्येकी एक तर पडसाळी व पाकणी येथे प्रत्येकी दोन, मोहोळ तालुक्यात सावळेश्वर, घाटणे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर, माढा तालुक्यातील वडोली, शिराळ, मंगळवेढा तालुक्यातील चिक्कळगी, पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर व गादेगाव, बार्शी तालुक्यातील वैराग, गौडगाव, शेळगाव आदी ठिकाणी आहेत.
----
यांना बजावली नोटीस
अनेक वर्षांपासून गाय खरेदी व पशुखाद्यासाठी उचललेली ॲडव्हान्सची २७ लाख ५० हजार रुपये भरण्यासाठी दूध संघाने ६ संस्थांना नोटीस
बजावली आहे. तत्काळ ही रक्कम भरा अन्यथा कायदेशीर वसुलीची कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. गणेशरत्न सांगोला १.८५ लाख, अहिल्यादेवी तळसंगी २.६७ लाख, श्रीराम केम २ लाख, प्रभावती रहाटेवाडी ४.९८ लाख, जनश्रद्धा शेटफळ १४ लाख, सिद्धनाथ शिरनांदगी २ लाख रुपये.
----