२१ व्या वर्षी लग्न; नोकरीला लागलेल्या मुलीच आता नवरी म्हणून मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:18 PM2021-12-18T12:18:54+5:302021-12-18T12:18:57+5:30
निर्णयाचे स्वागत; शिक्षण पूर्ण होईल अन् मानसिक, आर्थिक स्वावलंबी होतील
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मुलीच्या विवाहाचे वय आता २१ होणार आहे. याबाबतच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, विवाहामुळे शिक्षणाचा डाव अर्ध्यावरच मोडणाऱ्या मुली आता शिक्षण पूर्ण घेतील अन् मानसिक, आर्थिक स्वावलंबी होतील, असा विश्वासही सोलापुरातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
सध्या महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आहे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे आहे. आता केंद्राने वय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे; मात्र कायदा करण्यापेक्षा मुलींना सक्षम करण्यासाठी, त्यांची सुरक्षितता जपण्यासाठी अधिक परिणामकारक योजना अस्तित्वात आल्या पाहिजेत. समाजमन बदलण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचेही मत सोलापुरातील काही महिला सामाजिक कार्यकत्यांनी व्यक्त केले आहे.
-----------
केंद्राने घेतलेला निर्णय चांगला आहे. लग्नासाठी शिक्षण पूर्ण न होऊ देता १८ पूर्ण व्हायची वाट बघणाऱ्या पालकांना आता थांबावे लागेल आणि मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील, तसेच स्वावलंबी होतील. कमीत कमी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईल व मानसिक व आर्थिक स्वावलंबन वाढेल.
- अश्विनी राठोड, सामाजिक कार्यकर्त्या, सोलापूर.
-----------
निर्णय चांगला आहे. मुलींचे शिक्षण पूर्ण होईल. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुली स्वत:च्या पायावर उभे राहतील. स्वावलंबी बनतील. त्यामुळे महागाईच्या जमान्यात त्याच्या घराला, संसाराला हातभार लागेल. हा निर्णय तसा चुकीचाही आहे; मात्र आपण या निर्णयाकडे चांगल्या विचाराने पाहिले पाहिजे, असे मला वाटते.
- अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष, बालकल्याण समिती, सोलापूर.
------------
शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. हा निर्णय तळागाळापर्यंत रूजविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. ग्रामीण भागात दहावी किंवा बारावी झाली की मुलीचं लग्न, हाच एक मुद्दा असतो. पालकांच्या डोक्यात. कमी वयात लग्न होत असल्याने मुलींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आता ते होणार नाही.
- पूजा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्यां, सोलापूर.
-------------
करिअरमुळे मुलींच्या लग्नाचे वय लांबले...
शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मुलींच्या लग्नाच्या वयामध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. मुख्यत: उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचे लग्नाचे वय २५ वर्षांच्या पुढे गेले असून, २७ ते ३० वर्षे या वयामध्ये लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. करिअरमुळे या मुली लग्नाचा निर्णय पुढे ढकलत आहेत.
----------
‘त्या’ कायद्याच्या अंमलबजावणीचे काय झाले ?
देशात बालविवाह विरोधी कायदा अस्तित्वात येऊन १३ वर्षे उलटली, तरी जगातील सर्वाधिक बालविवाह होणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिल्या पाच राज्यांमध्ये समावेश आहे. मुलींवरील वाढते अत्याचार आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ,असा सवाल अनेकांनी लोकमतसमोर उपस्थित केला.