२३ गावकऱ्यांनी रोखले कोरोनाला वेशीबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:31+5:302021-05-30T04:19:31+5:30
अक्कलकोट : तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट संपत आली असली तरी आजही तब्बल २३ गावांच्या ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश ...
अक्कलकोट : तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट संपत आली असली तरी आजही तब्बल २३ गावांच्या ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळवले आहे. यामुळे त्या गावाच्या कोरोना विरोधी पथकाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
कोरोनाची पहिली लाट सौम्य असली तरी सुरूवात होती म्हणून सर्वत्र भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. काय काय उपाययोजना करायला हव्यात हेच कोणाला महिती नव्हते. अशा परिस्थितीला तोंड देत अनेक ग्रामपंचायती व कोरोना विरोधी पथकाने वारंवार गावात दवंडी देणे, औषध फवारणी करणे, बाहेरील लोकांना गावात एन्ट्री न देणे, कामाविना गावाबाहेर न सोडणे, सार्वजनिक कट्ट्यावर बसण्यास बंदी घालणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे अशी बंधने घालून लोकांना पालन करण्यासाठी अनिवार्य केले होते. यामुळे आतापर्यंत या गावात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.
----
कोरोनाचा ताप नको.. शेतीच्या कामात व्यस्त
याकामी ग्रामस्थांनीही कोरोना विरोधी समिती दररोज देत असलेल्या सूचनांचे पालन करीत आहेत. शिवाय या कोरोनाचा तापच नको म्हणून ग्रामीण जनतेचा विशेषतः शेताकडे प्रामुख्याने तेथील कामात व्यस्त असल्याचा कल दिसून आला. यामुळे गावात सकाळी ११ वाजल्यानंतर एरवी सार्वजनिक ठिकाणी दिसणारी माणसे दिसेनासे झाली.
--
या गावात पोहचला नाही संसर्ग
बोरेगाव, सोळसे तांडा, म्हेत्रे तांडा, मूगळी, महालक्ष्मी नगर, कलप्पावाडी, कोळेकरवाडी, बादोला खु, विजयनगर, सेवानगर, परमानंद तांडा, आंदेवाडी (ज.), जकापूर, जेऊरवाडी, संगोगी (ब), पालापूर, कुडल, देवीकवठे, कल्लकर्जाळ, धारसंग, ममनाबद, गौडगाव खु, कंठेहळळी या २३ गावांत अद्याप कोरोनाचा संसर्ग पोहोचला नाही. वारंवार जनजागृती करण्यावर कोरोना विरोधी समितीने भर दिल्याचे हे फळ आहे.
-----
२३ गावांतील ग्रामस्थ व कोरोना विरोधी समितीने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कठीण प्रसंगी सुद्धा या गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळवले आहे. त्यांनी शासनाचे नियमाचे तंतोतंत पालन केले आहे.
- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी
-
आतापर्यंत जी गावे कोरोनापासून चार हात लांब राहिले आहेत. ते केवळ त्या ग्रामस्थ व तेथील कोरोना विरोधी समितीचे यश आहे. अशाच प्रकारे ज्या गावात कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. त्या गावांनी सुद्धा शासनाचे नियम पाळून प्रयत्न केल्यास गावे कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
- अंजली मरोड, तहसीलदार
२९अक्कलकोट-कोरोना
सातनदुधनी येथे ग्रामस्थ एकत्रित येऊन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी शपथ घेताना सरपंच विठ्ठल खताळ, कोरोना विरोधी समिती, पोलीस अधिकारी बेरड, हवालदार सुनील माने आदी.