मंगळवेढा तालुक्यातील २३ गावांनी मिळविला कोरोनावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:51+5:302021-06-05T04:16:51+5:30
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांत या डेंजर व्हायरसची मोठी दहशत निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन ...
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांत या डेंजर व्हायरसची मोठी दहशत निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन काळात घरीच राहणे पसंत केले. तरुणांच्या मृत्यूतही कमालीची वाढ झाल्याने तरुणांसह आबालवृद्धांनी कोरोना चाचणीवर भर देऊन तातडीने उपचार केले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे झपाट्याने खाली आले आहेत. कोरोनामुक्त गावाचा आदर्श इतर गावांनी घेऊन तालुका कोरोनामुक्त करावा, अशी आशा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सद्य:स्थितीत २३ गावांनी कोरोनावर विजय मिळविला असला तरी सध्या हळूहळू अनलॉक होत असल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. सदरची गावे कोरोनामुक्त होण्यासाठी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. धनंजय सरोदे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. दत्तात्रय शिंदे, डॉ. संजय कांबळे, डॉ. वर्षा पवार, डॉ. भीमराव पडवळे, डॉ. श्रीपाद माने, सी.वाय. बिराजदार, हणमंतराव कलादगी, विस्ताराधिकारी प्रदीप भोसले यांनी परिश्रम घेतले.
या गावांनी केले कोरोनाला हद्दपार
अरळी, तामदर्डी, रहाटेवाडी, बठाण, खडकी, शिरसी, हुन्नूर, मानेवाडी, रेवेवाडी, लोणार, महमदाबाद हुन्नूर, पौट, मारोळी, सोड्डी, भालेवाडी, फटेवाडी, खोमनाळ, जित्ती, डिकसळ, कचरेवाडी, लेंडवे-चिंचाळे, हाजापूर, देगाव आदी २३ गावांमध्ये आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली आहे.
तालुक्यातील कोरोना आढावा
रुग्णसंख्या : ४,३६७
कोरोनामुक्त झालेले : ४,०५७
ॲक्टिव्ह रुग्ण : १७२
एकूण मृत्यू : १३८
कोट ::::::::::::::::::::::::::::
मंगळवेढा तालुक्यातील २३ गावांत सद्य:स्थितीत रुग्णसंख्या शून्यावर आहे, तर २९ गावांत केवळ १ ते २ रुग्णसंख्या आहे. नागरिकांनी कोरोनामुक्त झाल्याच्या आविर्भावात राहू नये. गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून विलगीकरण केंद्रात अथवा दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत.
- डॉ. नंदकुमार शिंदे,
वैद्यकीय अधिकारी, मंगळवेढा