सोलापूर जिल्हा परिषदेतंर्गत २५ कोटींची कामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:10 PM2018-05-18T12:10:03+5:302018-05-18T12:10:03+5:30
कर्जमाफीच्या निर्णयामुळे शासकीय तिजोरीला मोठी झळ बसेल, असा सरकारचा अंदाज होता.
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्ते विकास, रस्ते दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि जनसुविधेच्या कामांसाठी गेल्या तीन महिन्यांत सुमारे २५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातील जवळपास सर्वच कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. या काम वाटपात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी आपल्या ‘राजकीय नियोजनाला’ प्राधान्य दिले आहे.
कर्जमाफीच्या निर्णयामुळे शासकीय तिजोरीला मोठी झळ बसेल, असा सरकारचा अंदाज होता. सावधगिरीचे पाऊल म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये ३० टक्के कपात करण्यात आली. कर्जमाफीचे निकष फारच कडक राहिले. त्याने शासनाच्या तिजोरीला फारशी झळ बसली नाही. त्यामुळे शासनाने ३० टक्के कपातीचा निर्णय मागे घेतला.
जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा मंजूर केलेला होता. त्यानुसार काही कामांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी रस्ते विकास, रस्ते दुरुस्ती, जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकास आदी कामांसाठी नियोजन केले. त्यानुसार तीन महिन्यांत २५ कोटींहून अधिक रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही कामे आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी सुचविलेली आहेत.
शिंदे आणि डोंगरेंनी खेचली कामे
४झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेचा ३० टक्के सेस निधी करमाळ्यात खर्ची घातला आहे. नियोजन समितीमध्येही त्यांनी करमाळ्याला झुकते माप ठेवले आहे. रस्ते विकासासाठी करमाळा तालुक्यात २ कोटी ३० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. याखालोखाल माळशिरस तालुक्यात १ कोटी ८४ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्येही माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्वाधिक कामांचा समावेश आहे. माळशिरसनंतर माढा तालुक्यात सर्वाधिक कामे मंजूर करण्यात आली आहेत. बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी आपल्या मोहोळ तालुक्यात रस्ते, जनसुविधा, तीर्थक्षेत्रासाठी बरीच कामे मंजूर केली आहेत.
करमाळ्याला दिले
२ कोटी ३० लाख
- रस्ते विकासासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. नव्याने वाटप झालेला तालुकानिहाय निधी : बांधकाम विभाग क्र. १ : अक्कलकोट ८२ लाख, बार्शी ७६ लाख, मोहोळ ९० लाख, दक्षिण सोलापूर ४० लाख, उत्तर सोलापूर ४९ लाख, माढा १ कोटी ५८ लाख. बांधकाम विभाग क्र. २ : करमाळा २ कोटी ३० लाख, पंढरपूर ९२ लाख, मंगळवेढा ६७ लाख, माळशिरस १ कोटी ८४ लाख, सांगोला १ कोटी १६ लाख.
रस्ते विकासाबरोबरच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाच्या ३०५४ योजनेतून रस्ते दुरुस्तीसाठी ३ कोटी ५२ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. मोºया दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जनसुविधेसाठी २ कोटी २० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तीर्थक्षेत्र विकासासाठी २ कोटी ७० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश कामांना मंजुरी देताना महत्त्वाचे काम हाच निकष ठेवला आहे.
- विजयराज डोंगरे,
सभापती, अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद.