२५ कर्मचाऱ्यांनी केले सामूहिक मुंडन; जुन्या पेन्शनसाठी आंदोलनाची तीव्रता वाढली
By संताजी शिंदे | Published: March 17, 2023 12:58 PM2023-03-17T12:58:47+5:302023-03-17T12:59:07+5:30
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले.
सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा यासह अन्य विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी २५ कर्मचाऱ्यांनी सामूहिक मुंडन आंदोलन केले. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले.
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे निरसित करु नका, अनुकंपातत्वावर वारसांना विनाअट नियुक्त दया, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वीरपक्ष घेरडे, सिव्हिल हॉस्पिटल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव व वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे या तिघांनी प्रारंभी मुंडन करून या आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष शंतनू गायकवाड म्हणाले की, आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, परंतु सरकार कोणताही निर्णय घेत नाही. केवळ दोन ओळीचे पत्र आम्ही मागतोय, येत्या सहा महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्या, अन्यथा हे आंदोलन असे चालू राहील असा इशारा देण्यात आला.