सोलापुरातील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील २५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:33 PM2022-07-27T21:33:25+5:302022-07-27T21:34:21+5:30
Poisoning Case : बाधित सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास होत्या.
सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित वुमन्स पॉलिटेक्निक, वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेज येथील चौदा विद्यार्थिनींना अन्न किंवा पाण्यातून बाधा झाल्याने या सर्व विद्यार्थिनींवर इस्पितळात उपचार चालू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
बाधित सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास होत्या. त्यांना भोजनातून किंवा पाण्यातून प्रादुर्भाव झाल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यातील आठ विद्यार्थिनींना एस.टी. स्टँडजवळील सिध्देश्वर हॉस्पिटल येथे आणि सहा विद्यार्थिनींना भवानी पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व बाधित विद्यार्थिनींची प्रकृती पूर्ववत होत असल्याचे सांगण्यात आले. या सर्व विद्यार्थिनींवर देवस्थानच्या सर्व शिक्षण संस्थेतील प्रमुख घटक बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्यावर योग्य उपचाराची व्यवस्थाही करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सदर विद्यार्थिनी आणि पालक यांना कसलाही अधिक त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आपण स्वत: परगावी असल्याने घटनास्थळी समक्ष येऊ शकलो नाही. परंतु परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून योग्य ते निर्णय घेतले जात असल्याचे श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटी आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.
पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय पाटील इतर अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली आहे. सर्व विद्यार्थीनिंची विचारपूस केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.