सांगोल्यातील कारागृहातील २५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:02+5:302021-05-09T04:23:02+5:30
सांगोला येथील दुय्यम कारागृहात विविध गुन्ह्यात बंदी असलेल्या ६० पैकी आठ कैद्यांना ७ मे रोजी दुपारी अचानक त्रास होऊ ...
सांगोला येथील दुय्यम कारागृहात विविध गुन्ह्यात बंदी असलेल्या ६० पैकी आठ कैद्यांना ७ मे रोजी दुपारी अचानक त्रास होऊ लागल्याने सांगोला ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी केली. यामध्ये तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे उर्वरित ५२ कैद्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये २२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधित कैद्यांची संख्या २५ झाली आहे. सध्या विविध गुन्ह्यातील ६० कैद्यांची चार बराकमध्ये गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२७ मार्च रोजी याच कारागृहातील तब्बल २४ कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, तहसीलदार अभिजित पाटील, डाॅ. उत्तम फुले यांनी कारागृहाला भेट देऊन सर्व कैद्यांची तपासणी करून घेतली होती. त्यानंतर दीड महिन्याने पुन्हा याच कारागृहातील २५ कैदी पॉझिटिव्ह सापडल्याने कैद्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.