बचत गटातील ७३ महिलांना मंजूर झालेले कर्ज न देता २५ लाखाची फसवणूक, दोघांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: April 26, 2023 16:37 IST2023-04-26T16:37:20+5:302023-04-26T16:37:27+5:30
बचत गटातील महिलांना मंजूर झालेले कर्ज त्यांना न देता ते पैसे परस्पर घेत ७३ महिलांना २५ लाखाला फसवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बचत गटातील ७३ महिलांना मंजूर झालेले कर्ज न देता २५ लाखाची फसवणूक, दोघांवर गुन्हा
सोलापूर : बचत गटातील महिलांना मंजूर झालेले कर्ज त्यांना न देता ते पैसे परस्पर घेत ७३ महिलांना २५ लाखाला फसवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दादासाहेब अनिल मेटकरी ( रा. शनिवार पेठ, मेटकरी गल्ली, मंगळवेढा) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मेटकरी हे सोलापुरातील फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांना काही दिवसापूर्वी एक तक्रार आली त्यात आरोपी सिध्देश्वर परशुराम भिसे याने गैरव्यवहार केल्याचे सांगितले. यानुसार एक टीम नियुक्त करून या घटनेची चौकशी केली. दरम्यान, आरोपी भिसे रुजू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांना कर्ज मंजूर झाले, त्यातील किती जणांनी पैसे परत भरले याची चौकशी केली असता त्यावेळी आरोपीने ७३ महिलांना छोटे मोठे उद्योगासाठी कर्ज मंजूर केले होते.
कर्जाचे पैसे न देता आरोपी भिसे याने आरोपी मोहन राजेश्याम नल्ला याच्या इनेबल्ड पेमेंट सिस्टीम मशिनवरून कर्जदारांचे पैसे काढून घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आरोपी नल्ला याने आरोपी भिसे यांनी संगनमत करून सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात एकूण ७३ महिलांची २४ लाख ७० हजार ५९६ रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक विकास देशमुख करत आहेत.