बिबट्या, लांडग्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास शासनाकडून २५ लाखांची मदत
By शीतलकुमार कांबळे | Published: August 5, 2023 03:14 PM2023-08-05T15:14:57+5:302023-08-05T15:16:16+5:30
शासनाने सुधारणा करून नवा आदेश प्रसिद्ध केला
शीतलकुमार कांबळे, सोलापूर: वन्यप्राणी म्हणजेच बिबट्या, लांडगा, रानडूक्कर आदींच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत मिळणार आहे. यापूर्वी ही मदत १५ लाख रुपयांपर्यंत मिळत होती. शासनाने यात सुधारणा करुन नवा आदेश प्रसिद्ध केला आहे.
मागील आर्थिक तरतुदीनुसार मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तिला द्यायची आर्थिक मदत कमी होती. यात वाढ करण्याबाबत अनेकजणांनी मागणी केली होती. यापूर्वी माकड व वानर यांच्या हल्ल्यामध्ये जखमी व मृत झाल्यास व्यक्तीस नुकसान भरपाई देण्यात येत नव्हती. यात आता सुधारणा करण्यात आली असून माकड व वानर यांच्या हल्ल्यामध्ये जखमी व मृत झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
यांच्याकडून होतो हल्ला
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडूक्कर, लांडगा, तरस कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय), माकड, वानर यांच्या हल्ल्यामध्ये मनुष्य जखमी होतो. सोलापूर जिल्ह्यात बिबट्या, लांडगा, रानडुक्कर आदी प्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी व मृत झाले आहेत.