सव्वाएकरात २५ टन कांद्याचं उत्पादन; मात्र भाव नसल्याने साठवला चाळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:42+5:302021-05-15T04:20:42+5:30
अनगर येथे डॉ. नित्यानंद थिटे व प्रा. पत्नी स्वाती थिटे हे दोघे वडिलोपार्जित शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांनी ...
अनगर येथे डॉ. नित्यानंद थिटे व प्रा. पत्नी स्वाती थिटे हे दोघे वडिलोपार्जित शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांनी साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सव्वाएकरात उन्हाळी कांद्याचे विकमी २५ टन उत्पादन घेतले.
अधिक माहिती देताना ते म्हणाले, एकूण क्षेत्रापैकी सव्वाएकरमध्ये मशागतीनंतर ५ ट्रॉली शेणखत पसरवून टाकले. रेन पाइपच्या साहाय्याने सर्व क्षेत्र भिजवून घेऊन वाफशावर पुणे फुरसुंगीच्या ३ किलो बियाण्यांची पेरणी उपळाई येथील कांदापेरणीतज्ज्ञ शेतकरी सागर माळी यांच्याकडून कांदा पेरून घेतला. पेरणीनंतर २१ दिवसांनी तणनाशक विप सुपर व कांदा मोठा होण्यासाठी गोलची फवारणी केली. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने महिला मजुरांकरवी खुरपणी करून घेतली.
यानंतर मिश्र खतांच्या ४ पिशव्या, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या २ पिशव्या, पांढऱ्या पोटॅश पावडरच्या २ पिशव्या, याबरोबरच केरन या सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याला रेन पाइपचा वापर करत प्रत्येक वेळी फक्त रात्रीच पाणी दिले. द्रवामधून फॉस्फरस व पोटॅश सोडले, रासायनिक खते, सेंद्रिय तंत्रज्ञान व शेणखत या त्रिसूत्रीचा वापर, कीटकनाशक, बुरशीनाशकाची एकदाच फवारणी करूनही कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. कांद्याला रात्री मोजकेच गरजेएवढेच रेन पाइपने पावसाप्रमाणे पाणी दिल्याने कांदा तिखट न होता त्याला आकर्षक गोलाई, आकर्षक गुलाबी रंग येऊन पीक जोमदार आल्याने विक्रमी भरघोस उत्पादन मिळाले. पेरणीनंतर साडेतीन ते चार महिन्यांत कांदा काढणीस आला आहे; पण त्याला सध्या बाजारपेठेत भाव नसल्याने तो दर वाढेपर्यंत टिकून राहील, अशी आधुनिक कांदा चाळ उभारून त्यात तो साठविला आहे.
कांद्याच्या काढणीनंतर जमिनीत बेऊड (सुपीकता) तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी कांद्याचे पीक घ्यावे. यासाठी आम्हाला माझे मामा कृषिभूषण दादा बोडके यांचे मार्गदर्शन व सुहास पासले, प्रकाश थिटे, कांदा बीज उत्पादक शेतकरी अनिल गवळी यांचे सहकार्य मिळाले.
----
मी यावर्षी डिसेंबरमध्ये उन्हाळी, पुणे फुरसुंगी कांदा पेरल्याने यामध्ये माझी मोठी बचत झाली आणि रेन पाइपने तो भिजवल्याने त्यामध्ये तण जास्त न येता माल मोठा झाला. कांदा हा जीवनावश्यक घटकामध्ये येत असल्याने शेतकऱ्यांना परवडेल असा दर राहण्यासाठी त्यावर सरकारचे नियंत्रण हवे, तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी अपेक्षा नित्यानंद थिटे यांनी व्यक्त केली आहे.
---
१४अनगर
अनगर येथील उच्चविद्याविभूषित शेतकरी डॉ. नित्यानंद थिटे यांनी उत्पादित केलेला कांदा, भाव नसल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीने उभारलेल्या कांदा चाळीत साठवला आहे.
----
===Photopath===
140521\img-20210507-wa0045.jpg
===Caption===
अनगर येथील उच्च विद्याविभूषित डाॅ. नित्यानंद थिटे व प्रा. स्वाती थिटे यानी तयार केलेली कांदा चाळ