साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे
By राकेश कदम | Published: June 19, 2024 06:21 PM2024-06-19T18:21:02+5:302024-06-19T18:21:21+5:30
पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंजुर, आता प्रतिक्षा राज्य सरकारच्या मंजुरीची
जागतिक पर्यटनाच्या नकाशावर साेलापूर जिल्ह्याला आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या २५० काेटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मंजुरी दिली. या आराखड्यात एकट्या उजनी धरण परिसरात सुमारे २०० काेटी रुपयांची कामे निश्चित करण्यात आली आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण या आराखड्याला मान्यता देत असून यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल, त्याबाबतचा मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करावा व याच अधिवेशनातील अंदाजपत्रकात या आराखड्यासाठी टोकन निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान, पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे प्राथमिक स्तरावर जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले हाेते.
उपमुख्यमंत्र्यांनी या आराखड्याला निधी देणार असल्याचा शब्द दिला आहे. याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच बैठकीत दिली.
अशी हाेणार कामे -
सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा रेल्वे व रस्त्याने जोडलेला आहे. हा जिल्हा मंदिराचा जिल्हा असून येथे ९४ पर्यटन स्थळे आहेत. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे अक्वॉटिक टुरिझम तसेच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते. उजनी धरणाचे ९० किलोमीटर लांबीचे पात्र असून पात्राची रुंदी जवळपास सहा किलोमीटर आहे. येथे पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्र अनुभवयला मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पॅव्हेलियन निर्माण करण्यात येऊन यात माहिती, तिकीट केंद्र व प्रतीक्षलाय उभारण्यात येणार आहे. मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, एक हजार क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम,, रॉक पुल, सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाईंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रुझ सफारी, अक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आशीर्वाद यांनी सांगितले.