लॉकडाऊनमधील २५०० गुन्हे होणार रद्द; जाणून घ्या गुन्हे परत कसे घेतले जातात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 12:01 PM2021-02-05T12:01:08+5:302021-02-05T12:01:19+5:30
आरोपपत्र दाखल होणार : शासनाचे निर्देश येताच सुरू होणार कार्यवाही
संताजी शिंदे
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात दाखल झालेले सुमारे अडीच हजार गुन्हे रद्द होणार आहेत. शासनाचे निर्देश येताच ही कार्यवाही सुरू होणार आहे.
देशात व राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने दि.२३ मार्च २०२० रोजी पासून लॉकडाऊन जाहीर केला होता. तब्बल तीन महिने हा लॉकडाऊन सुरू राहिला. दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही आस्थापनेला परवानगी दिली गेली नव्हती. दरम्यानच्या काळात शहर व जिल्ह्यामध्ये सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. सोलापूर शहरांमध्ये प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय शहरातून फिरत असताना कोणी आढळल्यास पोलिसांकडून तत्काळ संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जात होती. पायी किंवा दुचाकीवर फिरत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करणे, अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा दुकानांना ठराविक वेळ दिली होती. वेळ संपली तरी दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी ही गुन्हे दाखल झाले आहेत. शहरातून बाहेर जाताना किंवा बाहेरून शहरात येताना विनापरवाना प्रवास करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जमावबंदीचा आदेश काढण्यात आले होते. मात्र तरीही गल्ली बोळामध्ये जमाव करून थांबणाऱ्या लोकांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हे परत कसे घेतले जातात?
- संचारबंदीच्या काळात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले जाणार आहेत. मात्र त्यासोबत गुन्हा परत घेण्याबाबत शासनाच्या निर्णयाची प्रत जोडून न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. त्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय घेणार आहे. शहर व जिल्ह्यातील दाखल गुन्ह्याबाबत अशाच पद्धतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
विनापरवानगी प्रवासाचे सर्वाधिक गुन्हे
- - लॉकडाऊनच्या काळामध्ये विनापरवानगी प्रवास करणाऱ्या लोकांवर सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान विनापरवानगी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त होती.
- - संचारबंदीच्या पहिल्या टप्प्यात विनापरवानगी फिरणाऱ्या लोकांवर जरब बसवण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाहन जप्तीची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये दुचाकी मोटारसायकल, तीनचाकी रिक्षा, चारचाकी कार गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. वाहन जप्तीची मोहीम हाती घेतल्यानंतर विनापरवाना फिरणाऱ्याची संख्या झपाट्याने कमी झाली.
- - वाहन मिळत नव्हते म्हणून बहुतांश लोक चालत पायी फिरत होते. अशा लोकांवर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य शासनाने हे गुन्हे काढून घेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अद्याप शासनाकडून निर्देश आले नाहीत. राज्य शासनाकडून निर्देश आल्यानंतर गुन्हे काढून घेण्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.
अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
- - लॉकडाऊन काळात दाखल गुन्हे -२५७८
- - विनापरवानगी घराबाहेर पडणे - १२८९
- - जास्त वेळ दुकान सुरू ठेवणे-३२१
- - विनापरवानगी प्रवास करणे-८२१
- - जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे - १४८