राज्यात आढळली २५ हजार शाळाबाह्य बालके; कोरोनामुळे शोधमोहिम थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:54 PM2021-04-27T12:54:51+5:302021-04-27T12:55:00+5:30
वाशिममध्ये फक्त १३ शिक्षणबाह्य मुले : कोरोनामुळे पाच विभागांत शोध मोहिम नाही
सोलापूर : राज्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने १ ते १० मार्च दरम्यान विशेष शोध मोहीम घेण्यात आली. यात राज्यभरातून २५,२०४ शाळाबाह्य मुले सापडली आहेत. यामध्ये मुंबई उपनगरांमध्ये सर्वांत जास्त १० हजार १७७ शिक्षणबाह्य मुले, तर वाशिममध्ये सर्वांत कमी १३ शिक्षणबाह्य मुलांची नोंदणी झाली आहे, तर सोलापुरात २४९ मुले सापडली आहेत. यंदा कोरोनामुळे शोध मोहिमेला काही विभागांमध्ये परवानगी देण्यात आली नव्हती.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियमानुसार ६ ते १४ वयोगटांतील शाळेत कधीही दाखल न झालेली, शाळेत न जाणारी किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल अशा बालकांचा शोध घेण्यात येतो. प्रतिवर्षी ही शोधमोहीम फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारी मोहीम यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यामध्ये घेण्यात आली. यंदा शोधमोहिमेत कधीच शाळेत न गेलेले ७,८०६ बालकांमध्ये ४,०७६ मुले, तर ३,७३० मुलींचा समावेश आहे. तसेच शाळाबाह्य झालेल्या १७ हजार ३९७ बालकांपैकी ९,००८ मुले, तर ८,३८९ मुली यंदा सर्वेक्षणामध्ये आढळल्या. यात २८८ बालके हे बाल कामगार म्हणून काम करताना आढळले. शाळाबाह्य मुलांना नजीकच्या शाळेत वयानुरूप संबंधित वर्गात दाखल करण्यात येते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (एससीईआरटी) यांनी विकसित केलेल्या ''विद्यार्थी मित्र'' पुस्तका आधारे त्यांना नियमित शाळेत दाखल झाल्यानंतर प्रशिक्षण देण्यात येते.
कोरोनामुळे येथे झालं नाही शोधमोहीम
औरंगाबाद, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात कोविड १९च्या पार्श्वभूमीवर मोहीम राबविण्यात आली नाही. पिंपरी-चिंचवड मनपा व नागपूर मनपा क्षेत्रातही मोहीम सुरू करता आली नाही. यामुळे येथील शाळाबाह्य मुलांची आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही.
कोविडमुळे शाळा बंद कराव्या लागल्या, इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले नव्हते. त्यामुळे शोधमोहिमेत आढळलेली शाळाबाह्य मुले वयानुरूप शाळेत दाखल करता आले नाहीत. तसेच त्यांना विशेष प्रशिक्षण देता येणार नाही.
-राजेश क्षीरसागर, उपसंचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य