दामाजी कारखान्यात २८ कोटींचा गैरव्यवहार; ९० हजार साखरेच्या पोत्याची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 10:20 AM2021-06-26T10:20:57+5:302021-06-26T10:21:32+5:30

विशेष लेखापरीक्षकाचा ठपका ; साखर सहसंचालकाकडे अहवाल सादर

28 crore fraud in Damaji factory; Mutual sale of 90,000 bags of sugar | दामाजी कारखान्यात २८ कोटींचा गैरव्यवहार; ९० हजार साखरेच्या पोत्याची परस्पर विक्री

दामाजी कारखान्यात २८ कोटींचा गैरव्यवहार; ९० हजार साखरेच्या पोत्याची परस्पर विक्री

googlenewsNext

मंगळवेढा : मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबाबत सहकारी संस्थेच्या वर्ग १ चे विशेष लेखापरीक्षक जी.व्ही. निकाळजे यांनी तपासणीत गंभीर दोष नोंदवले आहेत. त्याबाबतचा अहवाल त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांना सादर केला आहे.


या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत अशोक कृष्णा जाधव व इतर २१ जण यांनी दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून कारखान्याच्या कारभारावर आक्षेप नोंदवले होते. त्यामध्ये लेखापरीक्षक जी.व्ही. निकाळजे यांनी केलेल्या तपासणीत आक्षेप आढळले.


२०१७-१८ व २०१८-१९ मध्ये उत्पादित झालेली साखर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई यांच्याकडे माल तारण कर्जापोटी ताब्यात दिली. तक्रारदाराने ७५ हजार क्विंटल साखर कमी असल्याचे अर्जात म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात ९० हजार ६७० क्विंटल साखर कारखान्याने सदर बँकेस न कळवता परस्पर विक्री केली.


  बँकेचे तपासणी अधिकारी देखील या प्रकरणात सामील असून या साखर विक्रीपोटी २८ कोटी १३ लाख ४ हजार ७८० रक्कम बँक कर्ज खात्यामध्ये जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली.


या साखर विक्रीची रक्कम माल तारण खात्यात भरणा न केल्यामुळे नाहक व्याजाचा भुर्दंड कारखान्याला सोसावा लागला. सदरच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन कार्यकारी संचालक व संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.


 साखर विक्री टेंडरबाबतची जाहिरात जास्त खप असलेल्या वर्तमानपत्रात दिली नसल्याचे निदर्शनास आले. या नियमबाह्य पद्धतीमुळे साखर विक्री केल्याने स्पर्धात्मक दराचा फायदा कारखान्यास मिळाला नाही.
कारखान्यावर साधारणत २०० कोटीचे कर्ज आहे, गेल्या महिन्यापासून कारखान्यातील कामगार पगारापोटी ६ कोटी ७० लाख ६१ हजार ७९९ रूपये झाले थकीत आहेत. प्रायव्हेट फंडाच्या २ कोटी ७३ लाख ८४ हजार १६० रकमेचा भरणा केला नाही.
कारखान्यांमधील ३८ कर्मचारी मयत असून , त्यांची ३१ लाख ५२ हजार ५३३ इतकी रक्कम अद्याप देणे आहे. सदर रक्कम थकीत राहण्याच्या कारणाचा खुलासा मागणी करून सादर केला नाही.


सन २०१८-१९ या कालावधीतील ताळेबंद व नफा-तोटा पत्रक संशयास्पद वाटत असल्याचे तक्रारदाराने नमूद केले. याबाबत या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी तक्रारदाराने कोणत्या सालातील ताळेबंद व नफा तोटा याचा उल्लेख केला न करता कंपनी संशयास्पद म्हटले आहे
 
--------------------------------------
लेखापरीक्षण अहवालाबाबत कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळाबरोबर  सविस्तर चर्चा करण्यात येईल त्यानंतर याबाबत आम्ही आमचे म्हणणे प्रसिद्धीसाठी देऊ
-झुंझार आसबे ,

कार्यकारी संचालक, दामाजी कारखाना मंगळवेढा

Web Title: 28 crore fraud in Damaji factory; Mutual sale of 90,000 bags of sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.