दीपोत्सवासाठी भावसार समाजाकडून ७ डबे तेल; मार्कंडेय जनजागृती संघ देणार पाच हजार पणत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:48 AM2020-01-02T10:48:15+5:302020-01-02T10:50:20+5:30
सर्व घटक सरसावले; सुवर्ण गणपती शिवजन्मोत्सव, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचेही योगदान
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी होणाºया लक्ष दीपोत्सवासाठी सर्वच जाती-धर्मातील घटक सरसावले असून, क्षत्रिय समाज ट्रस्टच्या वतीने गोडे तेलाचे पाच डबे देण्याचे विश्वस्त सूर्यकांत महिंद्रकर तर भावसार क्षत्रिय समाजाचे कार्याध्यक्ष किसन गर्जे यांनी दोन डबे देण्याचे जाहीर केले. तर मार्कंडेय जनजागृती संघ पाच हजार मातीच्या पणत्या श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण करणार आहे. सुवर्ण गणपती शिवजन्मोत्सव आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानही दीपोत्सवात सहभागी होताना आपला खारीचा वाटा उचलणार असल्याचे संस्थापक बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.
ग्रामदैवताच्या मंदिरासह सोलापूरमधील विविध उत्पादनांचे ब्रॅण्डिंग होण्याच्या हेतूने ‘लोकमत’च्या संकल्पनेतून १० ते १२ जानेवारीपर्यंत मंदिर अन् तलाव परिसरात लक्ष दीपोत्सव साजरा करण्यासाठी वीरशैव व्हिजन, विजापूर वेस युवक संघटना, श्री मार्कंडेय जनजागृती संघ, जी. एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सकल पौरोहित्य कल्याणकारी संस्था, सकल ब्राह्मण समाज, हिंदू धनगर सेना आणि माहेश्वरी प्रगती मंडळाने पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून लक्ष दीपोत्सव अन् प्रकाशमय यात्रेबाबत जनजागृतीपर पत्रके वाटून सर्वच जाती-धर्मातील घटकांसह व्यापारी, उद्योजक, विविध सेवाभावी संस्था, बँका, विविध पक्षांच्या प्रमुखांना आवाहन करण्यात येत आहे. लक्ष दीपोत्सवात सहभागी होणे म्हणजे आमच्या हातून एक सेवा घडेल, ही अपेक्षा व्यक्त करुन प्रत्येक घटक यासाठी सरसावत आहे.
महाराष्ट्र वीरशैव महिला आघाडीतर्फे दोन हजार पणत्या-गुंगे
- महाराष्ट्र वीरशैव महिला आघाडीने खास बैठक घेऊन तीन दिवस चालणाºया दीपोत्सवात हिरीरिने सहभागी होण्याचा निर्णय घेताना दीपोत्सवासाठी दोन हजार मातीच्या पणत्या देण्यात येणार असल्याचे अध्यक्षा पुष्पा गुंगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दसरा महोत्सवात म्हैसूर पॅलेस जसा झळाळून निघतो अगदी तसेच श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर लक्ष दीपोत्सवाने उजळवू या, असा निर्धार पुष्पा गुंगे यांच्यासह उपाध्यक्षा राजेश्वरी भादुले, सचिव संगीता वांगी, कोषाध्यक्षा सुप्रिया गावसाने, मार्गदर्शक विजयाताई थोबडे, संघटक प्रिया बसवंती, स्मिता उंब्रजकर, सदस्य वैशाली चौगुले, गुरुदेवी सालक्की, सरिता नरोळे, प्रेमा ढंगे, पौर्णिमा धल्लू, श्रीदेवी नरोळे, कल्पना ढंगे, सविता धल्लू, अरुणा होसमेट, कमल ममनाबाद, मंजुळा मातोळी, महानंदा पाटी, संगीता बोरगावकर, शैला हवले, आशा कोरे, गीता माळी आदींनी केला आहे.
‘लोकमत’च्या संकल्पनेतून अन् इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हाती घेतलेला लक्ष दीपोत्सव श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरणार आहे. लक्ष दीपोत्सवामुळे सोलापूरचे ब्रॅण्डिंग होण्यास एक मदत होईल. लक्ष दीपोत्सवासाठी भावसार क्षत्रिय समाज ट्रस्टच्या वतीने गोडे तेलाचे पाच डबे देण्यात येणार आहे.
-सूर्यकांत महिंद्रकर
विश्वस्त- क्षत्रिय समाज ट्रस्ट.
‘लोकमत’च्या संकल्पनेतून इतर सात ते आठ संघटनांच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त हाती घेण्यात आलेल्या दीपोत्सवाचा अधिक आनंद आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलल्याशिवाय हा दीपोत्सव यशस्वी होणार नाही. म्हणूनच क्षत्रिय भावसार समाजाचे योगदान असावे म्हणून तेलाचे दोन डबे देऊन आपली सेवा श्री सिद्धरामेश्वर चरणी अर्पण करणार आहे.
-किसन गर्जे, कार्याध्यक्ष- भावसार क्षत्रिय समाज.
भागवत चाळीतील कार्यकर्ते स्वयंसेवकाची भूमिका बजावणार
- ‘लोकमत’च्या संकल्पनेतून आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या वतीने घेण्यात आलेला दीपोत्सव सोहळा कौतुकास्पद असाच आहे. भागवत चाळीतील सुवर्ण गणपती शिवजन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आतिष बंगाळ, अमोल पवार, उमेश जंब्बगी, दिलीप रेड्डी, उमाकांत निकम, चंद्रकांत निकम, जयंत जोशी, शेखर कळसकर, सौरभ नाईक, अमृत हवळे, हर्षद कुलकर्णी, अवधूत पवार, नागेश दहिहंडे, राम जाधव, राहुल डांगे, मनोज पाटील, ओंकार हवळे, गोकुळ रेड्डी, अक्षय नाईक आदी स्वयंसेवकाची भूमिका बजावतील, असे संस्थापक बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त लक्ष दीपोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली. दीपोत्सवासाठी सुवर्ण गणपती शिवजन्मोत्सव आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मातीच्या पणत्या अथवा द्रोण जे काही अधिकाधिक देता येईल, यावर अधिक भर देण्यात येणार आहे. दीपोत्सव सोहळ्यात मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवकाची भूमिकाही बजावतील.
-बाळासाहेब गायकवाड,
संस्थापक- सुवर्ण गणपती शिवजन्मोत्सव मंडळ.