१३० दिवस... १४ टन द्राक्षांचे उत्पादन अन् मिळविले २६ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 01:21 PM2020-03-20T13:21:52+5:302020-03-20T13:25:16+5:30

आकुंब्यातील दत्तात्रय सुर्वे कुटुंबाची यशोगाथा; शिक्षित मुलांमध्ये प्रयोगशीलतेची गवसणी

3 days ... 5 tonnes of grapes produced and earned 3 lakhs | १३० दिवस... १४ टन द्राक्षांचे उत्पादन अन् मिळविले २६ लाखांचे उत्पन्न

१३० दिवस... १४ टन द्राक्षांचे उत्पादन अन् मिळविले २६ लाखांचे उत्पन्न

Next
ठळक मुद्दे- आकुंब्याच्या बेदाण्याला दुग्ध व्यवसायाचाही गोडवा - आज या शेतीला दुभत्या जनावरांची जोड मिळाली- पंढरपूरच्या बाजारपेठेत आकुंब्यातील बेदाण्याचा बोलबाला सुरू 

मारुती वाघ 

मोडनिंब : उदरनिर्वाहासाठी दहा वर्षांपूर्वी १६ एकर जमीन घेतली... सुरुवातीला काही वर्षे गहू,ज्वारी, तूर अशी नगदी पिके घेतली... शिक्षित मुलांमध्ये प्रयोगशीलतेची गवसणी घातली... काही ठिकाणची पिके अन् लागवड पाहिली... त्यानंतर कमी एकरात अधिक द्राक्षाच्या माध्यमातून बेदाणा घेण्याचा निर्णय घेतला़ जमिनीची काळजी घेत मशागतीनंतर चार एकरात शेणखताचा मोठा वापर केला़ या जोरावर बेदाणा घेतला़या व्यसायाला दुग्धव्यसायाची जोड मिळाली आहे़ पंढरपूरच्या बाजारपेठेत आकुंब्यातील बेदाण्याचा बोलबाला सुरू आहे.

ही किमया साधली आहे दत्तात्रय सुर्वे आणि त्यांच्या तीन मुलांनी़ मोडनिंबमध्ये राहून त्यांनी पैसे जमा केले आणि या पैशातून त्यांनी माढा तालुक्यात आकुंबे येथे १६ एकर जमीन घेतली़ सुरुवातीला नगदी पिके घेतली़ त्यानंतर दत्तात्रय यांची मुले अजित, अमित आणि अभिजीत यांनी बेदाण्याचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला़ जवळच्या नर्सरीतून क्लोन जातीची द्राक्षाची १६ हजार रोपे आणली़ ती चार एकरात ९ बाय ४ अंतरावर लावली.

मशागतीनंतर शेणखतावर जोर दिला़ ड्रिपद्वारे दररोज तीन तास पाणीपुरवठा केला़ काही प्रमाणात बँ्रडेड रासायनिक फवारण्या केल्या़ १३० दिवसांत द्राक्षे लगडली़ त्यानंतर घड काढून ते सोडा आणि डिटींग आॅईलमध्ये बुडवून लोखंडी शेडवर वाळायला घातले़ १५ दिवसांत द्राक्षं सुकली आणि त्याचा बेदाणा झाला़ त्यानंतर नेटिंगच्या साहाय्याने हा माल बॉक्समध्ये भरून घेण्यात आला़ आज बेदाणा घेण्याचे चौथे वर्ष आहे़ पंढरपूरमधील बाजारपेठेने अनपेक्षित दिलासा दिला़ दुसºया वर्षी या बेदाण्यातून २६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ यंदाही तेवढेच उत्पन्न अपेक्षित आहे़ आज या शेतीला दुभत्या जनावरांची जोड मिळाली आहे.

फवारण्या वाढवल्या...
- अलीकडे ढगाळ हवामान, अवकाळी अशी अनेक नैसर्गिक संकटे वाढत गेली़ त्यामुळे फवारण्या वाढल्या़ सुरुवातीला ही संकटं नसताना ४५-५० फवारण्या कराव्या लागल्या होत्या़ आता अवकाळी, नैसर्गिक संकटातून पीक वाचवण्यासाठी या फवारण्या वाढवण्यात आल्या़ आता फवारण्या ८० वर गेल्या आहेत़ 

जमीन घेतली तेव्हा फळपिकांची माहिती नव्हती़ मात्र, मुलांच्या मनात प्रयोगशील शेतीची जिज्ञासा दिसून आली़ अनेक ठिकाणची पीकपद्धत मुलांनी पाहिली़ अनेकांचा द्राक्षाकडे कल असताना मुले मात्र बेदाण्याकडे वळली़ त्यामागे त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे़ यापुढील काळात सूक्ष्म नियोजनातून शेती करून घेतली जाणार आहे़ यामुळे उत्पन्नाबरोबर नावलौकिकही होत आहे़
- दत्तात्रय सुर्वे, बेदाणा उत्पादक, आकुंबे 


 

Web Title: 3 days ... 5 tonnes of grapes produced and earned 3 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.