सोलापूर जिल्हा बँकेवर ३०० कोटींचा बोजा, चेअरमन राजन पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:26 PM2018-09-14T13:26:31+5:302018-09-14T13:29:53+5:30
जिल्हा बँकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे
सोलापुर: सोलापूर जिल्हा सहकारी बँकेने राज्य बँकेतील २७४ कोटी रूपयांच्या ठेवींवर ६० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट काढल्याने जिल्हा बँकेच्या बाहेरील कर्जाचा बोजा आता ३०० कोटी रूपयांचा झाला आहे. संचालक मंडळाच्या कालावधीत बँकेवर २४० कोटी रूपयांचे बाहेरील कर्ज होते अशी माहिती बँकेचे चेअरमन माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.
जिल्हा बँकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे; पण कर्जामध्ये मागील तीन महिन्यात कर्जामध्ये सातत्याने वाढच होत आहे. बँकेकडून राज्य बँकेतील ठेवीही मोडल्या जात आहेत. २९९ कोटी रूपयांच्या एकूण ठेवींपैकी २५ कोटी रूपयांच्या ठेवींची मुदत संपलेली असताना ती रक्कमही बँकेने काढून इतरत्र वळविण्यात आल्याचेही राजन पाटील यांनी सांगितले.
संचालक मंडळाच्या कालावधीत खरीप हंगामासाठी अवघे ४५ कोटी कर्ज वाटप झाले होते. प्रशासक अविनाश देशमुख यांनी पीक कर्ज वाटप १८० कोटीपर्यंत केले; पण त्याचवेळी बाहेरील कर्जाचा बोजा ३०० कोटी रूपयांपर्यंत वाढला. बॅक बरखास्तीच्या निर्णयाला संचालकांनी दिलेल्या उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत कर्ज वाटपालाही हरकत घेण्यात आली आहे. कर्ज वाटप धोरणात्मक निर्णय असल्याने नव्याने कर्ज वाटपालाही न्यायालयाने मनाई केली आहे. या स्थितीत राज्य बॅकेतील मुदत संपलेल्या २५ कोटी रूपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत आणि ६० ओव्हर ड्राफ्ट काढला आहे. यामुळेच कर्जाचा बोजा वाढत असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले़