Good News; ३२ हजार स्टेशन मास्तरांना ५४०० ग्रेड पे मिळणार
By Appasaheb.patil | Published: February 28, 2020 11:07 AM2020-02-28T11:07:20+5:302020-02-28T11:12:04+5:30
रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय; सोलापूर विभागातील ४८६ जणांना झाला लाभ
सोलापूर : भारतीय रेल्वे खात्यातील मध्य, साऊथ, ईस्ट व नॉर्थ अशा ३२ हजार स्टेशन मास्टर्सना ५ हजार ४०० रुपये ग्रेड पे (वेतनश्रेणी) वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे़ याबाबतचा आदेश रेल्वे मंत्रालयात आयोजित बैठकीनंतर २५ फेबु्रवारी दुपारी २ वाजता काढण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे केंद्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रय व सोलापूर मंडलाध्यक्ष संजीव अर्धापुरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.
अखिल भारतीय स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतीय रेल्वे खात्यात असलेल्या सर्वच स्टेशन मास्तरांची वेतनश्रेणी वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती़ या मागणीच्या पूर्ततेसाठी स्टेशन मास्तर संघटनेने वर्षानुवर्षे विविध प्रकारचे आंदोलन करून प्रशासनाने लक्ष वेधले़ मागणी मान्य होत नसल्याने स्टेशन मास्टर्स असोसिएशनने २५ फेबु्रवारी रोजी दिल्ली येथै महारॅलीचे आयोजन केले होते़ या रॅलीत रेल्वेतील १० हजार स्टेशन मास्टर्स सहभागी झाले होते.
दरम्यान, दिल्ली येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आल्यामुळे रेल्वे मंत्रालय परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले होते़ त्यामुळे पोलिसांनी महारॅली काढू दिली नाही़ महारॅलीत सहभागी झालेल्या स्टेशन मास्टर्स यांचा रोष लक्षात घेता रेल्वे मंत्रालयातील उपमुख्य निदेशक (पे कमिशन) वित्त आयोगाचे सुधा ए़ कुजर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ या बैठकीत भारतीय रेल्वेतील स्टेशन मास्टर्स यांना ५ हजार ४०० गे्रड पे (वेतनश्रेणी) वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा आदेश तत्काळ काढण्यात आला. यावेळी भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे केंद्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रय, सहसचिव पी़ सुनीलकुमार, आऱ डी़ स्वामी, झोन वित्त सचिव डी़ के़ अरोरा, सोलापूर मंडल अध्यक्ष संजीव अर्धापुरे, सचिव एस़ एऩ सिंग, मोनीकुमारी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशनवर झाला आनंदोत्सव...
- भारतीय रेल्वेचे माजी केंद्रीय अध्यक्ष शिवनपिल्ले याच्या पुण्यतिथीनिमित्त २५ फेबु्रवारी रोजी स्टेशन मास्टर्स असोसिएशनने मागणी दिवस साजरा केला़ या मागणीदिवशी आयोजित बैठकीत स्टेशन मास्टर्स यांना ५ हजार ४०० रुपये ग्रेड पे(वेतनश्रेणी) लागू झाल्याचे पत्र २५ फेबु्रवारी रोजी दुपारी ४ वाजता सोलापूर मंडल अध्यक्ष संजीव अर्धापुरे यांना प्राप्त होताच सोलापूर रेल्वे स्थानकावर लाडू, पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला़
या मागण्या अद्याप प्रलंबित़...
- - सुरक्षा किंवा तणाव भत्ता मिळावा
- - स्टेशन मास्टर्स संवर्गातील १० टक्के जागा ग्रुप बी अधिकारी पदोन्नती मिळावी
- - न्यू पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी
- - १२ तास कार्यकाळ काम रद्द करून कामाचे तास कमी करावेत
- - स्टेशन मास्टर्सना सर्व स्टेशनमध्ये विश्रांतीगृहाची व्यवस्था करावी
- - सर्व स्टेशनवर स्टेशन मास्टर्स पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करावी
- - भारतीय रेल्वेतील स्टेशन निर्देशकांची नियुक्ती स्टेशन मास्टर्स संवर्गातून करावी
- - कामाच्या व्याप पाहून अतिरिक्त स्टेशन मास्टर्सची नेमणूक करावी
भारतीय रेल्वे खात्यातील स्टेशन मास्टर्स यांच्या मागणीकडे रेल्वे बोर्डाने लक्ष घातले आहे़ २५ फेबु्रवारी रोजी झालेल्या बैठकीत वेतनश्रेणी वाढविण्यात आली़ उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे बोर्डाने दिले आहे़ वर्षानुवर्षे केलेल्या स्टेशन मास्टर्स यांच्या मागणीला आंदोलनाला यश आले आहे़ याचा फायदा देशभरातील ३२ हजार स्टेशन मास्टर्स यांना होणार आहे.
- संजीव अर्धापुरे
अध्यक्ष - स्टेशन मास्टर्स असोसिएशन, सोलापूर मंडल