सांगोला शहर तालुक्यात ३०१ ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:09+5:302021-04-13T04:21:09+5:30
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात सांगोला तालुक्यातील ५५ हजार २२७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ३ हजार ६११ ...
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात सांगोला तालुक्यातील ५५ हजार २२७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ३ हजार ६११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सिंहगड कोविड सेंटरमध्ये ७४ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल केले आहे. तर १६६ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.
सध्या तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात आणखी कोरोना केअर सेंटरची गरज भासणार आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा या वर्षी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे. मृत्युदरही अधिक असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क लावणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे, सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवणे, स्वतःला कोरोनापासून दूर ठेवणे अशी काळजी घेतली तरच आपण कोरोनापासून मुक्त होणार आहोत अन्यथा सर्वांनाच गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.
रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्ट करणे, यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तालुक्यातील महूद, यलमार मंगेवाडी, मांजरी, कडलास, गायगव्हाण, वाटंबरे या गावात रुग्णसंख्या वाढल्याने त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.